मुंबईतील घाटकोपर, दादर आणि चर्नी रोड परिसरात जैन धर्मीयांकडून रस्त्यांवर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून आता मनसे आणि जैन धर्मगुरूंमध्ये मोठा वाद पेटला आहे. या प्रकारावर मनसेने आक्रमक पवित्रा घेत थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. दादरमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्वतः याविरोधात आंदोलन केले, ज्याच्या प्रत्युत्तरात थेट देशपांडे यांच्या कार्यालयाबाहेरही अशा पट्ट्या मारण्यात आल्या होत्या. अखेर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने (BMC) मध्यस्थी करत या पांढऱ्या पट्ट्या तातडीने हटवल्या. रस्यांवर अशा प्रकारे पट्ट्या मारण्याची कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आली नव्हती, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
या वादात जैन धर्मगुरूंनी मनसेला आव्हान देत “आम्ही काय हातात बांगड्या भरल्या नाहीत, पांढरा रंग हा शांतीचे प्रतीक आहे, मनसेने हिंमत असेल तर मुंब्र्यात जाऊन आंदोलन करावे,” असे विधान केले होते. या विधानाला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. देशपांडे म्हणाले की, “बांगड्या भरल्या नाहीत असं म्हणणाऱ्या मुनींची महिलांबद्दलची मानसिकता यातून दिसून येते. आमच्या देशात अहिल्याबाई होळकरांसारख्या वीर महिलांचा इतिहास आहे.” तसेच, भोंग्यांच्या विरोधातील आंदोलनाचा दाखला देत त्यांनी, “आम्ही कुठे आंदोलन करायचे हे दुसऱ्यांनी शिकवण्याची गरज नाही, हिंमत असेल तर तुम्ही मुंब्र्यात अशा पांढऱ्या पट्ट्या मारून दाखवा,” असे थेट आव्हान जैन धर्मगुरूंना दिले.
संदीप देशपांडे यांनी या संपूर्ण प्रकाराचा उल्लेख ‘सांस्कृतिक दहशतवाद’ असा केला आहे. ते म्हणाले, “मी मासे खात नाही म्हणून माझ्या घरासमोर मच्छी मार्केट नको, अशी भूमिका घेणे म्हणजेच सांस्कृतिक दहशतवाद आहे. आम्ही अशा प्रवृत्तीला महाराष्ट्रात खतपाणी घालू देणार नाही. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाऊ घालून घाण करणे हाही एका प्रकारचा हट्ट आहे.” समाजात अनेक समाजसुधारकांनी जुन्या आणि चुकीच्या परंपरा बदलून समाजाला पुढे नेण्याचे काम केले आहे, त्यामुळे कालबाह्य झालेल्या परंपरा बदलण्यात काहीच चूक नाही, असेही त्यांनी नमूद केले.
शेवटी, कायद्याचे महत्त्व अधोरेखित करताना मनसे नेत्यांनी स्पष्ट केले की, रस्ता ही सार्वजनिक मालमत्ता असून ती विद्रूप करण्याचा अधिकार कोणालाही नाही. देशातील कायदा आणि नियम सर्वांसाठी सारखेच आहेत आणि त्याचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे. “व्यापाऱ्यांना पैशांचा हिशोब समजतो, पण त्यांनी कायद्याचा अभ्यासही केला पाहिजे. आमच्या नादाला लागू नका, जिथे कुठे सार्वजनिक नियमांचे उल्लंघन करून असे प्रकार घडतील, तिथे मनसैनिक कायदेशीर आणि आमच्या पद्धतीने पोहोचतील,” असा कडक इशारा देशपांडे यांनी दिला आहे.




