Sanjay Raut : धारावीत मध्यरात्री बुलडोझर; “मराठी माणसाला संपवण्यासाठी अदानींकडून अंडरवर्ल्डची मदत?” संजय राऊतांचा खळबळजनक आरोप!

spot_img

“रात्रीच्या अंधारात सामाजिक संस्थांवर हातोडा, म्हाडा-पोलीस गप्प”; खासदार राऊतांचा राज्य सरकार आणि गौतम अदानींवर थेट हल्लाबोल

मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या तोडक कारवाईवरून राजकारण कमालीचे तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी या कारवाईवरून उद्योगपती गौतम अदानी आणि महायुती सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “धारावीत सध्या विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेवर अत्याचार सुरू असून, येथील मराठी माणसाला कायमचे उद्ध्वस्त करण्याचा हा एक मोठा डाव आहे,” असा घणाघाती आरोप राऊत यांनी केला. स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि माजी नगरसेवकांनी स्वखर्चातून उभारलेल्या व्यायामशाळा, मैदाने आणि सामाजिक संस्थांवर मध्यरात्रीच्या वेळी बुलडोझर चालवले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी धारावीतील परिस्थिती अत्यंत भयानक असल्याचे सांगत सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले, “परवा रात्री कोणत्याही कारणाशिवाय एका माजी नगरसेवकाची व्यायामशाळा तोडण्यात आली. आता तर येथील शाळा आणि मैदानेही ताब्यात घेण्याचा सपाटा लावला आहे. या सर्व संस्था कोणत्याही नफ्यासाठी चालवल्या जात नव्हत्या, तर त्या लोकहिताच्या होत्या. रात्री-अपरात्री होणाऱ्या या कारवाईमुळे धारावीत हाहाकार माजला आहे.” म्हाडा किंवा पोलीस प्रशासन या अन्यायाविरोधात कोणतीही कारवाई करण्यास तयार नसून, ते केवळ हात वर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा विषय थेट मराठी माणसाच्या अस्मितेशी आणि अस्तित्वाशी जोडलेला असून, म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही धारावी वाचवण्यासाठी मैदानात उतरलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

या संपूर्ण प्रकरणाला अंडरवर्ल्डशी जोडत राऊत यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला आहे. “धारावीवर जबरदस्तीने ताबा मिळवण्यासाठी गौतम अदानींनी गुंडांच्या फौजा तैनात केल्या आहेत का? की यासाठी अंडरवर्ल्डच्या डॉनला सुपाऱ्या दिल्या गेल्यात?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या कारवाईत सहभागी असलेल्या अनेक गुंडांची नावे आपल्याकडे आली असून, ती लवकरच पोलीस आयुक्तांकडे सोपवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या गंभीर परिस्थितीवर आजच आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर खासदारांशी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचा संदर्भ देत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक प्रशासनाला धारेवर धरले. “पंतप्रधान सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत, तिथे कदाचित अदानी दुसरी एखादी मोठी व्यावसायिक डील करायला जातील. त्यांनी जगभरातून काहीही मिळवावे, पण गरीबांची धारावी का गिळत आहेत?” असा सवाल त्यांनी केला. शेवटी, देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी नेत्यांना आव्हान देत, “हा मराठी माणसाला हुसकावून लावण्याचा छुपा अजेंडा नेमका कोणासाठी सुरू आहे, याचे उत्तर त्यांनी जनतेला दिले पाहिजे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ