Laxman Hake on Rohit Pawar : रोहित पवारांचे उपोषण म्हणजे ‘मर्सिडीजला नांगर जुंपण्यासारखं’; लक्ष्मण हाकेंचा जरांगे आणि पवारांवर थेट हल्लाबोल!

spot_img

“आंदोलन स्थळी CCTV लावा अन् जरांगेंनी हिंमत असेल तर नवीन पक्ष काढावा”; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची सणसणीत टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भाजप गोटातून या आंदोलनावर आधीच ‘नौटंकी’ म्हणून टीका होत असताना, आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रोहित पवारांवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत हल्ला चढवला आहे. “पवार कुटुंबातील माणूस आज शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलनाला बसलाय, ही मोठी शोकांतिका आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, रोहित पवारांच्या आंदोलन स्थळावर तातडीने सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवावेत आणि त्यांना तिथे सलग आठ-दहा दिवस बसू द्यावे, म्हणजे दुधाचं दूध अन् पाण्याचे पाणी होईल,” अशी थेट मागणी हाके यांनी केली. रोहित पवारांना टोला लगावताना ते म्हणाले की, हे आंदोलन म्हणजे केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेली ‘आयती गर्दी’ आहे. जर तुमच्याच पक्षाचे लोक तिथे येऊन टिमकी वाजवणार असतील, तर शेतकऱ्यांच्या मुलांना बोलण्याची संधी कधी मिळणार? महाराष्ट्रातील विठ्ठलाचा भाविक आणि सामान्य जनता अत्यंत सुज्ञ आहे. ज्यांनी राज्यातील सहकार क्षेत्र आणि कारखाने मोडीत काढून ते भंगारात काढले, ज्यांनी शिक्षण संस्थांच्या नियमांमध्ये बदल करून ५०० हून अधिक संस्थांवर स्वतःच्या कुटुंबाची मक्तेदारी निर्माण केली आणि ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर स्वतःचे नाव कोरले, ते आज शेतकऱ्यांच्या बाजूने उपोषणाला बसत आहेत. हा प्रकार म्हणजे ‘बकऱ्याच्या लग्नात जाऊन अक्षता टाकण्यासारखा’ आणि ‘मर्सिडीज कारला नांगर जुंपण्यासारखा’ अत्यंत हास्यास्पद आहे.

रोहित पवारांनंतर लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावरही तोफ डागली. जरांगे पाटील हे केवळ राजकारण करत असून ते कोणाच्या तरी गुप्त अजेंड्यावर काम करत असल्याचा आरोप हाके यांनी केला. सरकार कितीही जीआर (GR) काढत असले तरी जरांगेंच्या मागण्या कधीच संपणार नाहीत, कारण त्यांचे आंदोलन संपवण्याचा त्यांचा हेतूच नाही. हाके म्हणाले, “मनोज जरांगे यांना राजकारण करण्याची खूप मोठी खूमखूमी आहे. मग त्यांनी सरळ एक नवा राजकीय पक्ष काढावा आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरून दाखवावे.” जरांगे यांच्या मागण्या पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा करत हाके यांनी सांगितले की, कुणबी नोंदी सापडल्याचे ठरवण्याचा कायदेशीर अधिकार सरकारला नसून तो केवळ ‘स्टेट बॅकवर्ड कमिशन’ला (राज्य मागासवर्ग आयोग) आहे.

याच दरम्यान पुणे आणि नाशिक परिसरामध्ये कुणबी दाखले काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बोगस आणि बेकायदेशीर कागदपत्रे जोडली जात असल्याचा खळबळजनक आरोप हाके यांनी केला. नाशिक जिल्ह्याची वंशावळ थेट पुणे जिल्ह्यात जोडून बोगस दाखले तयार केले जात असून, या वंशावळी जोडणारे दलाल आज लखपती झाले आहेत, असा दावा त्यांनी पूर्ण पुराव्यानिशी केला. हा ओबीसींचे आरक्षण पद्धतशीरपणे संपवण्याचा एक मोठा कुटील डाव आहे, असे सांगत हाके यांनी सरकारला थेट इशारा दिला. महाराष्ट्रात ६० टक्के लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आता गप्प बसणार नाही. ओबीसींच्या हक्काच्या अन्नात माती कालवून जे राजकारण करत आहेत, त्यांना सत्तेवरून बेदखल करण्यासाठी आणि त्यांची योग्य जागा दाखवण्यासाठी संपूर्ण ओबीसी बांधव आता मागे-पुढे पाहणार नाहीत, असा सज्जड दमही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. पंचायती राजमधील ओबीसींचे नेतृत्व आधीच धोक्यात आले असून, आता समाज आपल्या अस्तित्वाची लढाई अधिक तीव्र करेल, असे संकेत त्यांनी दिले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ