Devendra Fadnavis : ‘काँग्रेस हे बुडतं जहाज, त्यात कुणी पाय ठेवणार नाही’; विरोधकांच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर फडणवीसांचा सणसणीत टोला

spot_img

बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाणा’ म्हणत संजय राऊतांना सुनावले; मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या विकासाचाही घेतला आढावा

देशातील विविध विरोधी पक्षांच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. मात्र, या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी पुढाकार घेतलेल्या या चर्चेचा उल्लेख करत, “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाणा,” अशी खोचक टीका फडणवीसांनी केली. काँग्रेस हे एक ‘बुडते जहाज’ असून, त्यामध्ये कोणताही चतुर नेता आपला पाय ठेवण्याचे धाडस करणार नाही, असे म्हणत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला. भाजपला या विलिनीकरणाची भीती वाटत नाही, उलट विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपला अधिकची ‘राजकीय पोकळी’ (Political Space) उपलब्ध होईल आणि त्याचा आम्हालाच फायदा होईल, अशी भूमिका मांडत त्यांनी या घडामोडींकडे ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेतून पाहत असल्याचे स्पष्ट केले.

दुसरीकडे, मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचे कौतुक करताना फडणवीसांनी ‘३६० डिग्री’ बदलाचे गुणगान गायले. भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेले सरकार आणि २५ कोटी जनतेची गरिबीतून झालेली मुक्तता ही मोदी सरकारच्या कारभाराची फलश्रुती असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला सक्षमीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या ‘लखपती दीदी’ योजनेचा विस्तार करून, आता ३ कोटींनंतर पुढील लक्ष्य ६ कोटी महिलांना लखपती करण्याचे असल्याचे त्यांनी जाहीर केले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना, सरकारने दिलेल्या सूचनेनुसारच पेरण्या करण्याचे आवाहन त्यांनी केले. ४० लाख शेतकऱ्यांना कोणतीही अट न ठेवता कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचा दावा करत, जनावरांसाठी पुरेशी वैरण उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. शेतीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी सोयाबीन आणि कापसाच्या पारंपरिक पीक पद्धतीतून बाहेर पडून पिकांचे वैविध्य जपण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, राज्याचे अर्थखाते आपल्याकडेच असल्याने शेती आणि शेतकऱ्यांच्या गरजांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ