Pranit More Controversy : महिलांचा घोर अपमान करणाऱ्या हिमांशू जांगडाची नोकरी गेली; डॉक्टर मुलीच्या विकृत कमेंटनंतर अभिनेत्री पूनम पांडेनेही सुनावले खडेबोल

spot_img

‘बिग बॉस’ फेम आणि आपल्या शोमध्ये बोल्ड कंटेंटचा वापर करणारा स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे सध्या त्याच्या एका शोमधील आक्षेपार्ह आणि अश्लील विधानांमुळे प्रचंड वादात सापडला आहे. सोशल मीडियावर या शोमधील काही क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या वादाची सुरुवात प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या हिमांशू जांगडा नावाच्या मुलाच्या एका वक्तव्याने झाली, ज्याने ३७० रुपयांच्या बिर्याणीचा दाखला देत महिलांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केले. समाजात आपण ज्या स्त्रीला आदराचे स्थान देतो, तिचे कुटुंब आणि समाज घडवण्यातील योगदान नाकारून कॉमेडीच्या नावाखाली अशा पद्धतीची थट्टा उडवली गेल्याने लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हिमांशू जेव्हा एका मुलीबद्दल असे अभद्र बोलत होता, तेव्हा शोचा होस्ट प्रणीत मोरे त्याला रोखण्याऐवजी तिथे उपस्थित प्रेक्षकांसह हसत त्याला प्रोत्साहन देत होता. या गंभीर प्रकरणाची दखल घेत हिमांशूला आधीच नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे, तर दुसरीकडे प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत या विचारसरणीचा तीव्र निषेध केला आहे. “आम्हा महिलांचे पिरीयड्स पॅड्स सुद्धा ३७० रुपयांपेक्षा महाग असतात, तोंड सांभाळून बोल,” अशा कडक शब्दांत पूनमने त्याला चोख चपराक लगावली आहे.

हा वाद शमतो ना शमतो, तोच या शोमधील डॉ. सेजल पवार या डॉक्टर तरुणीचा दुसरा एक व्हिडिओ समोर आला आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी दान केलेल्या मृतदेहांच्या (Dead Body) गुप्त भागांवर मस्करीत बोलून तिने मृतदेहांचा अवमान केल्याचा आरोप होत आहे. संवेदनशील मानल्या जाणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील एका डॉक्टर मुलीनेच असे विकृत वक्तव्य केल्यामुळे आणि प्रणीत मोरेने त्याला दाद दिल्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. परिणामी, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली चालणारा हा अश्लीलतेचा बाजार आता पूर्णपणे कायदेशीर कचाट्यात अडकण्याची चिन्हे आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ