Latur News : लंडनमध्ये कार्यरत मराठी आयटी इंजिनिअरची आत्महत्या; शेवटच्या फोनने कुटुंबीयांना दिला धक्का

spot_img

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील बोडका गावातील मूळ रहिवासी असलेले हनुमंत पाटील यांचे लंडनमध्ये आत्महत्येमुळे निधन झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. उच्च शिक्षणाच्या बळावर परदेशात यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या हनमंत यांनी आयटी क्षेत्रात चांगले स्थान निर्माण केले होते. आकर्षक पगार, स्थिर नोकरी आणि उज्ज्वल भविष्य असूनही त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हनमंत पाटील गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. त्यांचे वैवाहिक आयुष्य सुमारे आठ वर्षांपूर्वी सुरू झाले होते. मात्र मागील काही काळापासून पती-पत्नीमध्ये मतभेद वाढल्याचे सांगितले जात आहे. या वादांमुळे दोघे वेगळे राहत असल्याचीही माहिती समोर आली आहे. कौटुंबिक तणाव आणि न्यायालयीन प्रक्रियांमुळे त्यांच्यावर मानसिक दबाव वाढत असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी त्यांच्यासह कुटुंबीयांविरोधात मोठ्या आर्थिक दाव्याची याचिका दाखल केल्याचेही सांगितले जात आहे.

या सर्व घडामोडींमुळे हनमंत मानसिकदृष्ट्या खचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वात वेदनादायक बाब म्हणजे, टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या नातेवाइकांशी फोनवर संपर्क साधला होता. या संभाषणादरम्यान त्यांनी अत्यंत भावनिक शब्दांत निरोप दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर काही वेळातच त्यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.

या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. परदेशात यशस्वी करिअर घडवणाऱ्या एका तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने मानसिक आरोग्य, कौटुंबिक तणाव आणि भावनिक आधार यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या प्रकरणामुळे अनेकांना अंतर्मुख करणारे प्रश्नही निर्माण झाले आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ