महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे वेगवान हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगत असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही नेते संपर्कात नसल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण आणखी तापवले आहे. ठाकरे गटाने महत्त्वाची बैठक बोलावली असताना आधी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याबाबतही अशाच चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संजय जाधव सध्या संपर्कात नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, काही काळापूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळेही त्यांच्या नावाची मोठी चर्चा झाली होती. “मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही,” असे वक्तव्य करत त्यांनी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत कोणतेही स्पष्ट संकेत दिले नव्हते. त्यांच्या या विधानानंतर ते दुसरा राजकीय मार्ग स्वीकारणार का, याबाबत अनेक चर्चांना सुरुवात झाली होती.
दरम्यान, त्यांच्या त्या वक्तव्यावर नंतर विविध स्तरांवर स्पष्टीकरणेही समोर आली आणि चर्चांचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा बैठकीपूर्वी संपर्काबाहेर असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटातील नेत्यांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत या घडामोडींमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ ठाकरे गटच नव्हे, तर राज्यातील इतर राजकीय पक्षही बारकाईने लक्ष ठेवून आहेत.




