Nanded Anchal Mamidwar Case : सक्षम ताटे हत्येप्रकरणाला नवं वळण! “त्याच्या लहान भावाने गैरवर्तन केलं म्हणून…”; घर सोडण्यावर प्रेयसी आंचलचा खळबळजनक खुलासा!

spot_img

“सासरच्यांनी विश्वास ठेवला नाही, म्हणून पोलिसांच्या मदतीने वडिलांकडे गेले”; सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर आंचल मामिडवारचे चोख प्रत्युत्तर

नांदेडमध्ये सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या सक्षम ताटे हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. प्रेयसीच्या घरच्यांनी सक्षमची केलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतर त्याची प्रेयसी आंचल हिने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करून आयुष्यभर त्याच्याच घरी राहण्याचा घेतलेला निर्णय, या भावनिक कहाणीची देशभरात चर्चा झाली होती. मात्र, आता या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि वेगळे वळण आले आहे. आंचलने सक्षमचे घर सोडल्याची बातमी समोर आल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर आता आंचल मामिडवार हिने स्वतः जाहीरपणे समोर येत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अत्यंत गंभीर खुलासे केले आहेत.

काही दिवसांपूर्वी सक्षमची आई संगीता ताटे यांनी आंचलवर आरोप केला होता की, ती आजीकडे जाण्याचा बहाणा करून घर सोडून निघून गेली आहे. या आरोपांना उत्तर देताना आंचलने सासरच्यांवरच खळबळजनक आरोप केले आहेत. आंचल म्हणाली, “मी कोणताही बहाणा करून घर सोडलेले नाही. सक्षमचा लहान भाऊ माझ्याशी सातत्याने गैरवर्तन करत होता. हा प्रकार असह्य झाल्यानेच मी सर्वांना पूर्वकल्पना देऊन ते घर सोडण्याचा निर्णय घेतला.” आंचलच्या या विधानाने या संपूर्ण प्रकरणात आता पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून दिली आहे.

आपल्यावरील प्रसंगाची भीषणता सांगताना आंचल पुढे म्हणाली की, “सक्षमच्या भावाच्या या गैरवर्तनाची माहिती मी सक्षमच्या कुटुंबीयांना दिली होती. मात्र, त्यांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवण्यास साफ नकार दिला. जर आज घरात माझ्यासोबत असं घडत आहे आणि कुटुंब पाठीशी उभे राहत नाही, तर भविष्यात आणखी काही अघटीत घडल्यास हे लोक माझ्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाहीत, ही भीती मला वाटली. म्हणूनच मी स्वतः पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः माझ्या सुरक्षेसाठी सोबत येत मला माझ्या वडिलांच्या घरी सुखरूप सोडले. सध्या मी माझ्या वडिलांकडेच राहत आहे.”

आंचलने घर सोडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या चारित्र्यावर संशय घेत नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. या ट्रोलिंगवर आंचलने तीव्र शब्दांत आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. “लोकांनी पडद्यामागची सत्य परिस्थिती आणि खरी बाजू जाणून घेतल्याशिवाय कोणावरही असे घाणेरडे आरोप करू नयेत,” अशा थेट शब्दांत तिने ट्रोलर्स कानउघाडणी केली आहे. एका बाजूला सक्षम गमावल्याचे दुःख आणि दुसऱ्या बाजूला सासरच्या घरातून मिळालेली वागणूक या दुहेरी चक्रव्यूहात आंचल अडकल्याचे या मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ