३७० रुपयांची बिर्याणी आणि मृतदेहांची थट्टा उडवणं पडलं महाग; सायबर पोलिसांकडून तिघांनाही चौकशीसाठी समन्स जारी
‘बिग बॉस’ फेम स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे आणि त्याच्या शोमधील वादग्रस्त क्लिप्समुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता या प्रकरणात मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर महिलांबद्दल आक्षेपार्ह, अश्लील आणि अत्यंत अवमानकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी प्रणीत मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार यांच्यासह इतरांविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या विविध कलमांखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, सायबर सेलने या तिघांनाही चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले आहे.
हा संपूर्ण वाद प्रणीत मोरेच्या ‘लाइव्ह स्टँड-अप शो’दरम्यान सुरू झाला, जेव्हा प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या हिमांशू जांगडा नावाच्या तरुणाने एका मुलीसोबतच्या आपल्या ‘डेट’चा किस्सा सांगितला. त्याने ३७० रुपयांच्या चिकन बिर्याणीचा खर्च ‘वसूल’ करण्याच्या बहाण्याने महिलांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केले. हे बोलणे ऐकून प्रणीत मोरे आणि शोमधील लोक हसत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत या विकृत मानसिकतेचा निषेध केला. महिलांच्या सुरक्षिततेला आणि प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणाऱ्या या विधानामुळे हिमांशूला आधीच नोकरी गमावावी लागली आहे.
याच शोमधील दुसरा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर हा वाद आणखी पेटला. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या डॉ. सेजल पवार या तरुणीने शिक्षण आणि अभ्यासासाठी दान केलेल्या मृतदेहांच्या (कैडेव्हर) गुप्त भागांवर मस्करीत बोलून मृतदेहांचा आणि वैद्यकीय नैतिकतेचा घोर अवमान केला होता. या आक्षेपार्ह विधानालाही प्रणीत मोरेने मंचावरून प्रोत्साहन दिले होते. या दोन्ही क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगानेही (NCW) याची गंभीर दखल घेतली आहे. आता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणात कठोर पावले उचलली असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चालणाऱ्या या प्रकारावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे.




