महाराष्ट्र सरकारने १ मेपासून राज्यातील परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मुंबई आणि उपनगरांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत असून, काही स्तरांवर विरोधही व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, १ मेपासून RTO मार्फत विशेष मोहीम राबवली जाईल, ज्यामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येते का, याची तपासणी केली जाईल. राज्यात व्यवसाय करायचा असल्यास स्थानिक भाषा येणे आवश्यक असल्याची सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
तसेच, ज्या चालकांना मराठी समजत नाही, त्यांच्यासाठी प्रशिक्षणाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी विविध साहित्यिक संस्था पुढाकार घेत असून, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ७२ विभागांकडून एक सोपा आणि उपयुक्त अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. या माध्यमातून चालकांना मराठी सहज समजेल, बोलता येईल आणि दैनंदिन व्यवहारात वापरता येईल, यावर भर दिला जाणार आहे.




