Pune Crime : पुण्यात पुन्हा टोळी संघर्ष भडकला; आंदेकर हत्या प्रकरणाशी संबंधित तरुणाची गोळ्या झाडून हत्या

spot_img

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. शहरात पुन्हा एकदा टोळी संघर्ष उफाळून आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या भावाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, बालाजी नगर बस स्टँड परिसरात अक्षय ऊर्फ बाळा म्हस्के याच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. भर चौकात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत अक्षय म्हस्के याला रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

प्राथमिक तपासात आंदेकर आणि कोमकर टोळीतील जुने वैमनस्य या हत्येमागे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वनराज आंदेकर यांची दोन वर्षांपूर्वी नाना पेठ परिसरात गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या करण्यात आली होती. त्या घटनेनंतर शहरात दोन गटांमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे अनेकदा समोर आले आहे.

दरम्यान, या ताज्या हत्येमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ