पनवेलमधील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले मंडळ अधिकारी गोवर्धन माने यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. गावदेवीपाडा परिसरातील ४.२२ गुंठे जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव नोंद मंजूर करून देण्यासाठी माने यांनी संबंधित फिर्यादीकडे सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या रकमेमध्ये स्वतःसाठी २० हजार रुपये आणि थंब अप्रुव्ह प्रक्रियेसाठी संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यासाठी आणखी १० हजार रुपये अशी मागणी करण्यात आली होती. फिर्यादीने याबाबत रायगड-अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर ACBच्या पथकाने सापळा रचला. पनवेलमधील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ मिठास स्वीट्ससमोर माने हे ३० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या पथकाने केली.




