Navi Mumbai : महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एल्गार; नवी मुंबईत जोरदार आंदोलन

spot_img

वाढती महागाई, इंधनाच्या वाढलेल्या किमती आणि बेरोजगारीच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी नवी मुंबईत मोठे आंदोलन छेडले आहे. सर्वसामान्य नागरिकांवर वाढत्या आर्थिक भाराचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

आंदोलनात पक्षाचे प्रमुख नेते शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि रोहित पवार यांनी सहभाग घेतला. तसेच खासदार सुप्रिया सुळे देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत महागाईच्या मुद्द्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर वाढत्या इंधन दरांचा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतींचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनाला वेगळे आणि लक्षवेधी स्वरूप देण्यासाठी कार्यकर्त्यांनी भांडी वाजवत निषेध नोंदवला. तसेच रस्त्यावर चूल पेटवून भाकरी बनवण्याचे प्रतीकात्मक आंदोलन करत वाढत्या खर्चामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, या आंदोलनानंतर नवी मुंबईत मोर्चाही काढण्यात येणार असून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून महागाईचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ