राजकीय पुनर्वसनाच्या आश्वासनानंतर गणेश गीतेंचे नमते, लहान भाऊ गोकुळ गीते मात्र अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर उभा राहिलेला बंडखोरीचा मोठा पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी या वादात मध्यस्थी केल्यानंतर, भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या २४ तासांपासून मुंबईत सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठका आणि चर्चेनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. गिरीश महाजन आणि त्यांचे निकटवर्तीय निलेश बोरा यांनी मुंबईतील एका गुप्त ठिकाणी गणेश गीते यांच्याशी दीर्घ चर्चा केली. या बैठकीत महाजन यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत, आगामी काळात गणेश गीते यांचे पक्षात योग्य राजकीय पुनर्वसन केले जाईल, असे ठोस आश्वासन दिले. या आश्वासनानंतर महाजनांच्या शब्दाचा मान राखत गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास संमती दिली आहे.
परंतु, गणेश गीतेंनी माघार घेतली असली तरी महायुतीचा हा आनंद फार काळ टिकण्याची शक्यता कमी आहे. कारण या निवडणुकीत एक नवा ट्विस्ट निर्माण झाला असून, गणेश गीते यांचे लहान भाऊ गोकुळ गीते हे अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. गोकुळ गीते हे गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांच्या संपर्कात असून त्यांनी निवडणुकीची मोठी पूर्वतयारी केली आहे. गणेश गीते आता मुंबईहून नाशिकला परतल्यानंतर आपल्या भावाची समजूत काढणार असून, “घरचा प्रश्न घरीच सोडवू” असा विश्वास त्यांनी वरिष्ठ नेत्यांना दिला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे अवघे काही तास शिल्लक राहिले असून, गोकुळ गीतेंनी माघार घेतली तरच महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा मार्ग सुकर होईल. अन्यथा, गोकुळ गीते अपक्ष म्हणून रिंगणात राहिल्यास महायुतीच्या मतांमध्ये फूट पडून मोठा फटका बसण्याची भीती कायम आहे. त्यामुळे आता गोकुळ गीते माघार घेतात की नाही, याकडे संपूर्ण नाशिकच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




