रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नरबळी की क्रूर हत्या? धड नसलेल्या मृतदेहांमुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान
बिहारमधील कैमूर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भयानक घटना उघडकीस आली आहे. रामगड पोलीस ठाण्याच्या परिसरात गेल्या ४८ तासांत तब्बल चार धड नसलेले मृतदेह आणि शरीराचे तुकडे विखुरलेल्या अवस्थेत सापडल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारांनी मृतदेहांची विल्हेवाट इतक्या क्रूरपणे लावली आहे की, पोलिसांना अद्याप एकाचीही ओळख पटवता आलेली नाही. मंगळवारी रात्री आभैदे गावाजवळ एका पोत्यात मानवी अवयव सापडल्यानंतर या भीषण हत्याकांडाचा खुलासा झाला.
कैमूरचे पोलीस अधीक्षक आणि एसडीपीओ प्रदीप कुमार यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास चक्राला वेग दिला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश असण्याची शक्यता आहे. १० मे रोजी दुर्गावती नदीत काही अवयव सापडले होते, त्यानंतर कर्मनाशा नदीच्या काठीही असेच तुकडे आढळले. या सर्व घटनांचा एकमेकांशी संबंध असून, ही सामूहिक हत्या आहे की अन्य काही प्रकार, याचा शोध पोलीस घेत आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी शेजारील जिल्ह्यांतील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी केली जात असून, नागरिकांना कोणत्याही माहितीसाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




