आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ऑफिसचे काम, प्रवासातील वाहतूक कोंडी आणि घरगुती व्यस्ततेमुळे रात्री उशिरा जेवण करणे ही अनेकांची सवय झाली आहे. मात्र, वरवर सामान्य वाटणारी ही सवय तुमच्या आरोग्यासाठी, विशेषतः हृदयासाठी अत्यंत घातक ठरू शकते, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. आपल्या शरीरात एक नैसर्गिक जैविक घड्याळ (Circadian Rhythm) असते, जे झोपणे, उठणे आणि पचनक्रिया नियंत्रित करते. रात्रीच्या वेळी शरीर विश्रांतीच्या स्थितीत जात असताना आणि रक्तदाब कमी होत असताना जर जड जेवण केले, तर शरीराला ते पचवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागते. यामुळे पचनसंस्थेवर ताण येऊन रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते. दीर्घकाळ ही सवय राहिल्यास उच्च रक्तदाब, टाईप-२ मधुमेह आणि पर्यायाने हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. काही वैद्यकीय संशोधनानुसार, नियमितपणे उशिरा जेवणाऱ्या व्यक्तींमध्ये पक्षाघाताचा (Brain Stroke) धोकाही लक्षणीयरीत्या वाढल्याचे समोर आले आहे.
रात्री उशिरा जेवल्यामुळे केवळ हृदयच नाही तर झोपेच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होतो. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर येते, ज्याला ‘ॲसिड रिफ्लक्स’ किंवा छातीत जळजळ होणे म्हणतात. यामुळे झोपेत वारंवार व्यत्यय येतो. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील मानसिक तणाव वाढवणारी संप्रेरके (Stress Hormones) सक्रिय होतात, जी हृदयाच्या आरोग्यासाठी घातक असतात. विशेषतः लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि आधीपासूनच हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी उशिरा जेवणे म्हणजे आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे. हा धोका टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांनी रात्री ७ ते ८ च्या दरम्यान जेवण्याचा सल्ला दिला आहे. जेवण आणि झोप यामध्ये किमान ३ तासांचे अंतर असणे गरजेचे आहे. तसेच, रात्रीचे जेवण नेहमी हलके आणि सुपाच्य असावे, ज्यामध्ये सूप, सॅलड, डाळी, खिचडी किंवा मिश्र धान्यांच्या भाकरीचा समावेश करून तेलकट आणि गोड पदार्थ पूर्णपणे टाळावेत.




