Tukaram Mundhe : ‘एफडीए’चा पदभार स्वीकारताच डॅशिंग आयएएस अधिकारी ॲक्शन मोडमध्ये; बनावट पनीर आणि गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले

spot_img

राज्याचे नवे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यातील भेसळखोर आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात व्यापक युद्ध पुकारले आहे. “नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही,” असा कडक इशारा देत मुंढे यांनी ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत राज्यभरात धडक कारवायांचे सत्र सुरू केले आहे. गेल्या अवघ्या ६ दिवसांत एफडीएच्या पथकांनी मुंबई, पुणे, कोकण आणि नाशिकसह विविध विभागांत तब्बल २०३ ठिकाणी छापेमारी केली. या धडक मोहिमेत १ कोटी ५८ लाख २८ हजार रुपयांचा भेसळयुक्त आणि घातक पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १०२ जणांना अटक करण्यात आली आहे, तर ६८ व्यापारी आस्थापने तात्काळ सील करण्यात आली आहेत.

या आक्रमक कारवाईच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील दूध उत्पादक संघटनेच्या बड्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीला ‘चितळे डेअरी’चे ज्येष्ठ संचालक श्रीपाद चितळे, आबासाहेब थोरात आणि प्रकाश कुतवळ उपस्थित होते. दुधातील भेसळ रोखण्यासोबतच प्रामाणिकपणे दर्जेदार दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य आणि न्याय्य दर मिळालाच पाहिजे, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन मुंढे यांनी या वेळी दिले

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या ‘सर्जिक्स स्ट्राईक’चे सकारात्मक परिणाम आता थेट बाजारात दिसू लागले आहेत. विशेषतः बनावट आणि रासायनिक पनीर तयार करणाऱ्या अड्ड्यांवर झालेल्या कठोर कारवाईमुळे बनावट पनीर पूर्णपणे हद्दपार झाले आहे.

भेसळयुक्त पनीर बंद झाल्यामुळे आता बाजारात खऱ्या दुधापासून तयार केलेल्या शुद्ध पनीरची मागणी प्रचंड वाढली आहे. ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी आता अनेक नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या बाहेर ‘आमच्याकडे फक्त शुद्ध दुधाच्या पनीरच्याच भाज्या मिळतात’ असे विशेष फलक झळकू लागल्याची माहिती दूध उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

भेसळीचे प्रमाण तात्काळ ओळखण्यासाठी आणि गुणवत्ता तपासणीला वेग देण्यासाठी राज्यातील एफडीएच्या सर्व प्रयोगशाळांचे (Labs) तातडीने आधुनिकीकरण केले जात असल्याचेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या तडफदार कामगिरीमुळे प्रामाणिक व्यावसायिक आणि नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ