आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मोठी जबाबदारी मिळावी आणि एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. विदर्भ दौऱ्यात मिळालेल्या प्रतिसादाचा उल्लेख करत कडू यांनी, या भागातील नागरिक आणि शिवसैनिक शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित असल्याचा दावा केला. चार दिवसांत 20 सभा घेतल्याचे सांगत त्यांनी शिंदेंना पुन्हा नेतृत्वाची संधी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याचे मत मांडले.
तसेच, एकनाथ शिंदे यांना राजकीयदृष्ट्या कमी लेखण्याचा प्रयत्न झाला तर त्यांची लोकप्रियता आणखी वाढेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत या विधानाबाबत विचारले असता एकनाथ शिंदे यांनी हसत प्रतिक्रिया देत, “बच्चू कडू नेमके काय बोलले आहेत ते आधी समजून घेतो, त्यानंतर यावर बोलेन,” असे सांगितले. त्यांच्या या मोजक्या पण सूचक उत्तरामुळे राजकीय चर्चांना अधिकच वेग आला आहे.




