Crude Oil Prices Fall down : ट्रम्प यांच्या एका विधानाने जागतिक तेल बाजारात मोठी घसरण, लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

spot_img

अमेरिका-इराणमधील संभाव्य करारामुळे कच्चे तेल ५ टक्क्यांनी घसरले; ‘होर्मुज समुद्रधुनी’ मार्ग मोकळा होणार असल्याने दिलासा.

गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या भारतीय जनतेसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) किमतीत तब्बल ५ टक्क्यांची मोठी घसरण झाली असून, येत्या काळात ही घसरण आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमधून दिलेल्या एका महत्त्वपूर्ण अपडेटनंतर जागतिक तेल बाजारातील दरांचे आकडे झरझर खाली आले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यांच्यात एक मोठा करार पूर्ण होईल, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. या सकारात्मक बातमीमुळे दोन्ही देशांमधील युद्ध संपण्याच्या आशा बळवल्या असून बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर जागतिक पातळीवर ब्रेंट क्रूडचा भाव घसरून १०५ डॉलर प्रति बॅरलवर आला आहे, तर अमेरिकन बेंचमार्क वेस्ट टेक्सॉस इंटरमीडिएट (WTI) देखील कमी होऊन ९९ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आले आहे. फेब्रुवारी २०२६ च्या अखेरीस जेव्हा अमेरिका आणि इराणमध्ये थेट तणाव वाढला होता, तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास ४० टक्क्यांची अवाढव्य वाढ झाली होती. मात्र, आता चर्चा यशस्वी होताना दिसत असल्याने, आशिया आणि जगाचा इंधन पुरवठा करणारा मुख्य मार्ग पुन्हा पूर्ववत होण्याचे चिन्ह दिसत आहे.

तेल व्यावसायिक कंपन्या गेल्या दोन महिन्यांपासून ‘होर्मुज समुद्रधुनी’ (Strait of Hormuz) हा सागरी मार्ग पूर्णपणे खुला होण्याची वाट पाहत आहेत. जगभरातील एकूण इंधन पुरवठ्याचा तब्बल पाचवा भाग (२० टक्के) याच महत्त्वाच्या मार्गावरून वाहून नेला जातो. युद्धामुळे ही पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. भारताचा विचार केला तर, याच आठवड्याच्या सुरुवातीला देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात आधी ३ रुपये आणि नंतर ९० पैसे अशी एकूण सुमारे ४ रुपयांची मोठी वाढ झाली होती. आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार असून, सर्वसामान्य नागरिकांनाही पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरातून लवकरच सुटका मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ