‘मॉर्निंग वॉक’ दरम्यान रस्त्याशेजारील शेतातून बिबट्याने घेतली झडप; ग्रामीण रुग्णालयातील असुविधांमुळे पालकांचा संताप.
ओतूर,प्रतिनिधी: दि.२१ मे [ रमेश तांबे ]
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचे सत्र थांबताना दिसत नाहीये. आज, २१ मे २०२६ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ओतूर गावच्या हद्दीतील वाघचौरे मळ्यात बिबट्याने केलेल्या भीषण हल्ल्यात काव्या महेंद्र वाघचौरे ही १० वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. काव्या ही तिच्या १३ वर्षांच्या कल्याणी नावाच्या मोठ्या बहिणीसोबत गोटीशिवार मांदरणे मार्गावर मॉर्निंग वॉक करत असताना, अचानक रस्त्याशेजारील शेतातून दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घातली. या हल्ल्यात बिबट्याने चिमुरड्या काव्याच्या पाठीवर दोन ते तीन ठिकाणी गंभीर जखमा केल्या. मात्र, अशा अत्यंत भीतीदायक प्रसंगातही मोठी बहीण कल्याणी हिने कमालीचे धैर्य आणि प्रसंगावधान दाखवत जोरजोरात आरडाओरडा सुरू केला, ज्यामुळे बिबट्याने तिथून पळ काढला आणि एक मोठा अनर्थ टळला.
कल्याणीच्या आवाजामुळे मुलीचे वडील महेंद्र वाघचौरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काव्याला उपचारासाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आणि या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत गोरे व डॉ. वैष्णवी ठिकेकर यांनी तिच्यावर तातडीने प्रथमोपचार केले. मात्र, जखमा गंभीर असल्याने तिला पुढील प्रगत उपचारासाठी नारायणगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
ओतूर आणि जुन्नर परिसरात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून या नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यासोबतच, ओतूरसारख्या मोठ्या ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर आणि पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल मुलीचे वडील महेंद्र वाघचौरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “एका जखमी मुलीवर पुढील उपचारांसाठी आम्हाला नारायणगाव किंवा पुण्याचा रस्ता धरावा लागत असेल, तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे,” अशा शब्दांत त्यांनी स्थानिक आरोग्य प्रशासनावर ताशेरे ओढले असून, ओतूर ग्रामीण रुग्णालयात तातडीने संपूर्ण सोयी-सुविधांसह तज्ज्ञ स्टाफची नेमणूक करण्याची मागणी केली आहे.




