मे महिना संपत आला असून सोमवारपासून जून महिन्याची सुरुवात होत आहे. अशातच जर तुम्ही बँकेतील महत्त्वाची कामं करण्याचा विचार करत असाल, तर जून महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची माहिती आधी जाणून घेणं गरजेचं ठरणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जून 2026 मधील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली असून या महिन्यात देशभरातील बँका एकूण 11 दिवस बंद राहणार आहेत.
नेहमीप्रमाणे दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. याशिवाय विविध धार्मिक सण, प्रादेशिक उत्सव आणि विशेष दिवसांमुळे काही राज्यांमध्ये अतिरिक्त सुट्ट्याही असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी बँकांशी संबंधित कामांचं नियोजन करताना आपल्या राज्यातील सुट्ट्यांची माहिती तपासून घेणं आवश्यक आहे.
जून महिन्यात 7, 14, 21 आणि 28 जून या रविवारी बँका बंद राहतील. तसेच 13 जूनला दुसरा शनिवार आणि 27 जूनला चौथा शनिवार असल्याने देशभरात बँकांना सुट्टी असेल. याशिवाय मोहरमसारख्या धार्मिक सणांमुळेही काही शहरांमध्ये बँक व्यवहार बंद राहणार आहेत. 25 जूनला विजयवाडा येथे मोहरमनिमित्त सुट्टी असेल, तर 26 जून रोजी मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, पाटणा आणि श्रीनगरसह अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील.
तसेच 15 जूनला अझिवल आणि भुवनेश्वरमध्ये विशेष प्रादेशिक सणांमुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 29 जूनला संत गुरु कबीर जयंतीनिमित्त शिमलामध्ये बँका बंद राहतील, तर 30 जूनला अझिवलमध्ये आणखी एक स्थानिक सुट्टी असेल.
दरम्यान, बँका बंद असल्या तरी ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग, यूपीआय, मोबाईल बँकिंग आणि एटीएम सेवा सुरू राहणार आहेत. मात्र चेक व्यवहार, खाते उघडणे, कर्ज प्रक्रिया किंवा डीडी काढणे यांसारख्या कामांसाठी बँक सुरू असलेल्या दिवशीच शाखेत जावं लागणार आहे.




