कोलकात्यानंतर पुन्हा एकदा देश हादरला; सुरुवातीला आत्महत्येचा दावा, मात्र अहवालात सामूहिक बलात्काराचे गंभीर संकेत
राज्यासह देशातील विविध भागांत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. कोलकात्यातील आर. जी. कर मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना ताजी असतानाच, आता बिहारची राजधानी पाटना येथून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर झालेल्या गंभीर अत्याचारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या या वैद्यकीय विद्यार्थिनीचा 10 जानेवारी 2026 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी हा मृत्यू झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन झाल्यामुळे झाल्याचा दावा केला होता. मात्र, मृत्यूनंतर करण्यात आलेल्या पोस्टमार्टम अहवालामुळे या प्रकरणाला पूर्णपणे वेगळं वळण मिळालं आहे.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, ही घटना आत्महत्येची नसून अत्यंत गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचाराकडे इशारा करणारी आहे. अहवालात विद्यार्थिनीच्या शरीरावर नखांनी ओरबाडल्याच्या खोल जखमा आढळून आल्या असून, या जखमा जबरदस्ती आणि तीव्र हिंसेचे स्पष्ट पुरावे देतात. डॉक्टरांनी एकापेक्षा अधिक व्यक्तींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
इतकंच नाही तर, पीडितेला बेशुद्ध करण्यासाठी किंवा तिचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी इंजेक्शन किंवा काही औषधांचा वापर करण्यात आल्याची शक्यताही अहवालात नमूद करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची औषधं देऊन पीडितेला नियंत्रणात ठेवण्यात आलं असावं, हे नाकारता येत नाही.
पोस्टमार्टममध्ये विद्यार्थिनीच्या चेहरा, मान, खांदे तसेच शरीराच्या वरच्या भागावर अनेक गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. तिच्या गुप्तांगाच्या परिसरात सूज, आत-बाहेर गंभीर जखमा आणि इतर दुखापती स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. या सर्व खुणा तिच्यावर अमानुष शारीरिक अत्याचार आणि प्रचंड हिंसा झाल्याचाच ठोस पुरावा देतात.
दरम्यान, मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी हॉस्टेलच्या संचालकावर थेट गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, ही घटना सुरुवातीपासूनच दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, तिला आत्महत्येचं स्वरूप देण्यात आलं. झोपेच्या गोळ्या घेतल्याची बनावट कथा रचून सत्य लपवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोस्टमार्टम अहवाल समोर आल्यानंतर त्यांच्या संशयाला अधिक बळ मिळालं आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा निर्भया प्रकरण आणि कोलकात्यातील ट्रेनी डॉक्टरवरील अत्याचाराच्या आठवणी ताज्या झाल्या असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.




