अनेकांना शिळे अन्न (Food) खाण्याची सवय असते. पण, शिळे अन्न खाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. अनेकवेळा अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे लागेल तेवढेच अन्न बनवून आपले आरोग्य राखणे कधीही चांगले. शिळे अन्न खाल्ल्याने सर्वात आधी पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे पोटाचे विकार सर्वाधिक होतात. पोटात दुखणे, पोटाला मुरडा येणे, जुलाब, उलटी, वारंवार टॉयलेट लागणे अशी लक्षणे दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये फूड पॉइझनिंग देखील होऊ शकते.
काही काळानंतर कुठल्याही पदार्थातील नैसर्गिक गुण बदलतात. अन्नातील जीवनसत्त्वे (Vitamins) कमी होतात. प्रथिने आणि खनिजे नष्ट होतात. तेलकट पदार्थांमध्ये दुर्गंधी येते. यामुळे अन्न पौष्टिक न राहता अपायकारक ठरते. शिळ्या अन्नामध्ये बॅक्टेरिया, फंगस आणि इतर सूक्ष्मजीव झपाट्याने वाढतात. विशेषतः भात, आमटी, उसळ, दूध, दही, मांसाहार यामध्ये जंतुसंसर्गाचा धोका अधिक असतो. हे जंतू शरीरात गेल्यास ताप, अंगदुखी, अशक्तपणा जाणवू शकतो. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गरोदर महिला आणि आधीच आजारी असलेल्या लोकांनी शिळे अन्न खाल्ल्यास त्रास अधिक गंभीर होऊ शकतो. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने संसर्ग लवकर होतो. दीर्घकाळ शिळे अन्न खाल्ल्यास पचनशक्ती कमजोर होते. आम्लपित्त, गॅसचा त्रास वाढतो. त्वचेचे विकार उद्भवू शकतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.




