अर्दहान प्रांताचे राज्यपाल मेहमत फतिह सिसेकली यांच्या समर्थनार्थ नागरिक उतरले रस्त्यावर; कपड्यांपेक्षा कामाला प्राधान्य देण्याची मागणी
एकिकडे भारतात ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीविरोधात तरुणांचे (Gen Z) मोठे आंदोलन पेटले असतानाच, दुसरीकडे तुर्कीमधून एका अत्यंत शुल्लक कारणावरून राज्यपालपदावरून हकालपट्टी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुर्कीच्या अर्दहान प्रांताचे राज्यपाल मेहमत फतिह सिसेकली यांनी सायकलिंग करताना घातलेल्या घट्ट स्पोर्ट्सवेअरवर (कपड्यांवर) आक्षेप घेत त्यांना पदावरून हटवण्यात आले. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि तरुणांनी थेट रस्त्यावर उतरत जोरदार विरोध दर्शवला आहे.
घटना अशी की, राज्यपाल मेहमत फतिह सिसेकली यांचे सायकलिंग करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये त्यांनी खेळाडूंसाठीचे नेहमीचे स्पोर्ट्सवेअर घातले होते. मात्र, सत्ताधारी पक्षातील काही खासदार आणि नेत्यांनी या पोशाखावर सार्वजनिक ठिकाणी आक्षेप घेत राज्यपालांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले. “राज्यपाल हे उच्च पदावरील व्यक्ती असल्याने त्यांनी सार्वजनिक जबाबदारी आणि राज्याची प्रतिष्ठा राखली पाहिजे,” असा युक्तिवाद करत या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात आला. जरी सरकारने त्यांच्या हकालपट्टीचे कोणतेही अधिकृत कारण दिले नसले, तरी या कृतीमुळे तीव्र रोष निर्माण झाला आहे.
दरम्यान, या टीकेला चोख प्रत्युत्तर देत राज्यपाल सिसेकली यांनी स्पष्ट केले होते की, आपण कोणतेही अयोग्य कपडे घातले नसून ते केवळ खेळासाठीचे सामान्य स्पोर्ट्सवेअर होते. स्वतः एक खेळाडू असलेले सिसेकली यांनी अर्दहान प्रांतात क्रीडा संस्कृती, सायकल पर्यटन आणि युवकांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत नागरिकांनी ऑनलाईन मोहिमेद्वारे १० हजारांहून अधिक पाठिंबा दर्शवला असून, “त्यांच्या कपड्यांपेक्षा त्यांनी केलेल्या कामाचा विचार व्हावा,” अशी ठाम भूमिका घेतली आहे. २२ जुलै रोजी अर्दहानमधून निरोप घेताना राज्यपाल सिसेकली कमालीचे भावूक झाले होते, तर दुसरीकडे या अनपेक्षित कारवाईमुळे तुर्कीमधील राजकीय व सामाजिक वातावरण तापले आहे.




