वालल्डबेरीजचे दोन मोठे कारखाने उद्ध्वस्त; ९ जणांचा मृत्यू तर ८० हून अधिक जखमी, झेलेन्सकी यांनी स्वीकारली जबाबदारी
रशिया आणि युक्रेनमधील लष्करी संघर्ष आता अधिकच तीव्र झाला असून युक्रेनने रशियन भूभागावर ड्रोनच्या साहाय्याने भीषण हल्ले चढवले आहेत. युक्रेनच्या हवाई दलाने थेट रशियाची सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंग कंपनी ‘वालल्डबेरीज’ (Wildberries) ची दोन अवाढव्य गोदामे, एक मुख्य ऑइल डेपो आणि इतर अनेक संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य केले. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या अचानक झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ८० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे जागतिक पातळीवर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
या ड्रोन मोहिमेतील पहिला भीषण हल्ला युक्रेनच्या सीमेपासून साधारण ३६० किलोमीटर दूर असलेल्या तांबोव क्षेत्रातील कोतोवस्कव येथील वाइल्डबेरीजच्या गोदामावर झाला. रात्रीच्या सुमारास जेव्हा गोदामात काम सुरू होते, तेव्हाच ड्रोन कोसळल्याने तिथे कार्यरत असलेल्या ७ कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर युक्रेनने दुसरा हल्ला मॉस्कोच्या पूर्वेला ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या इलेक्स्ट्रोस्टाल येथील गोदामावर केला. मॉस्को क्षेत्राचे गव्हर्नर आंद्रेई व्होरोब्योव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुसऱ्या हल्ल्यात ६१ जण गंभीर जखमी झाले, ज्यापैकी एकाने उपचारादरम्यान दम तोडला. जखमींमधील ४० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या औद्योगिक तळांशिवाय युक्रेनने नोगिंस्क येथील एका मोठ्या ऑइल डेपोलाही निशाणा बनवले. ड्रोन धडकताच या ऑइल डेपोला भीषण आग लागली, ज्याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने शेजारील रुग्णालय आणि नागरी इमारती रिकाम्या केल्या. याच मोहिमेदरम्यान युक्रेनचा एक ड्रोन थेट बालवाडीवर (किंडरगार्टन) कोसळल्याने तिथे आग भडकली होती, मात्र अग्निशामक दलाने वेळेत ती आटोक्यात आणली. याशिवाय, बेलगोरोड सीमेवर झालेल्या अन्य एका ड्रोन हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकी यांनी या हल्ल्यांची अधिकृत जबाबदारी स्वीकारत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. झेलेन्सकी यांच्या म्हणण्यानुसार, मॉस्को आणि तांबोवमधील ज्या लॉजिस्टिक्स केंद्रांवर हल्ले करण्यात आले, त्यांचा वापर रशियन लष्कराकडून ड्रोनचे प्रतिबंधित सुटे भाग पुरवण्यासाठी केला जात होता. तसेच नोगिंस्कचा ऑइल डेपो थेट रशियन सैन्याला इंधनाचा पुरवठा करत होता, ज्यामुळे त्याला उडवणे गरजेचे होते. यासोबतच काळ्या समुद्रात आणि आझोव समुद्रात रशियन सैन्याला मदत करणाऱ्या दोन मोठ्या टँकर जहाजांनाही यशस्वीरित्या लक्ष्य केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. या व्यापक हल्ल्यांमुळे रशियाच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




