भारतात इंधन दर स्थिर असले तरी कंपन्यांवर ताण; संकटाच्या काळात भारताला ‘रशिया’ची साथ, तर पाकिस्तानमध्ये आता रोज बदलणार पेट्रोलचे भाव
अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा निर्माण झालेल्या तीव्र लष्करी तणावामुळे जागतिक बाजारपेठ पुरती हादरली असून कच्च्या तेलाच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. या आंतरराष्ट्रीय युद्धाचा थेट फटका भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांसारख्या दक्षिण आशियाई देशांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. या संपूर्ण संघर्षाच्या काळात जागतिक बाजारातील वाढत्या किमतींमुळे भारतात तब्बल चार वेळा इंधन दरवाढीचे संकट आले होते. सध्या जागतिक पातळीवर कच्चे तेल महाग होत असतानाही भारताने देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत; मात्र याचा थेट परिणाम भारतीय तेल कंपन्यांवर होत असून त्यांना प्रचंड आर्थिक तोटा आणि दबाव सहन करावा लागत आहे. या कच्च्या तेलाच्या किमतीतील तीव्र चढ-उतारांना तोंड देण्यासाठी आता पाकिस्तान सरकारने एक असा मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये त्यांनी भारतालाही मागे टाकले आहे.
पाकिस्तान सरकारने आपल्या देशातील इंधन दरवाढीचा ताण कमी करण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या नव्या निर्णयानुसार, पाकिस्तानमध्ये आता दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुधारल्या (रिवाईज) जाणार आहेत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या भावाचा अंदाज घेऊन तेथील सरकार रोजच्या रोज इंधनाचे नवीन दर निश्चित करेल, ज्यामुळे तेल कंपन्यांवरील वाढता आर्थिक दबाव कमी होण्यास मदत होईल. अमेरिका-इराण युद्धाच्या सुरुवातीच्या काळात पाकिस्तानमध्ये तेलाचे दर आठवड्याला ठरवले जात होते आणि त्यापूर्वी दर १५ दिवसांनी बदलले जायचे. परंतु, जागतिक बाजारातील अस्थिरता पाहता आता हा रोजचा नियम लागू करण्यात आला आहे.
या युद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल सातत्याने महाग होत आहे. मध्यंतरी दोन्ही देशांनी परस्परांवरील हल्ले थांबवले होते, तेव्हा किमती काहीशा घसरल्याचे पाहायला मिळाले होते; मात्र आता पुन्हा युद्ध पेटल्याने किमतींनी उच्चांक गाठला आहे. भारताचा विचार केला तर, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झालेला असताना भारताचा जुना आणि जिगरी मित्र ‘रशिया’ मदतीला धावून आला. रशियाने भारताला मोठ्या सवलतीत आणि मुबलक प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा केला. रशियाच्या या भक्कम पाठिंब्यामुळेच बांगलादेश आणि पाकिस्तानसारखी भीषण आर्थिक व इंधन टंचाईची परिस्थिती भारतावर ओढवली नाही. दोन्ही देशांमधील हा लष्करी तणाव जेव्हा पूर्णपणे शांत होईल, तेव्हाच जागतिक बाजारासह देशांतर्गत पेट्रोल-डिझेलचे दर खऱ्या अर्थाने कमी होतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.




