जस्टिन अल्वोने प्रेमाखातर शहराची सुखसोयींची लाइफस्टाइल केली त्याग; आदिवासी पत्नीसोबत इक्वाडोरच्या वर्षावनात जगतोय साधेपणाचे आयुष्य.
प्रेम माणसाला कुठपर्यंत आणि कशी पावलं उचलायला भाग पाडू शकते, याचे एक अचंबित करणारी आणि रंजक कहाणी समोर आली आहे. अमेरिकेत वाढलेल्या अवघ्या २३ वर्षीय जस्टिन अल्वो या तरुणाने प्रेमापोटी आधुनिक जगातील सर्व सुखसोयी आणि शहराची गजबज पूर्णपणे मागे सोडत थेट अमेझॉनच्या घनदाट जंगलात संसार मांडला आहे. इक्वाडोरमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणून काम करणाऱ्या मारिया या शुआर आदिवासी समुदायातील तरुणीच्या प्रेमात पडल्यानंतर जस्टिनने आपले आयुष्यच बदलून टाकले. त्याचे वडील लहानपणी अशाच एका दुर्गम भागात राहिल्याने जस्टिनला या संस्कृतीबद्दल आधीपासूनच कुतूहल होते, अखेरीस प्रेमाच्या निमित्ताने तो इक्वाडोरच्या अमेझॉन वर्षावनात पोहोचला आणि याच आदिवासी समुदायाचा एक भाग बनला.
जंगलातील खडतर जीवन जगताना जस्टिनला सुरुवातीला अनेक संकटांचा सामना करावा लागला, विषारी वनस्पती, धोकादायक कीटक आणि सापांची भीती त्याच्यासाठी नवीन होती. शुआर समुदायाने मात्र त्याचे मनापासून स्वागत करत त्याला जंगल जगण्याचे नियम शिकवले. या प्रवासात एकदा त्याने नियमांचे उल्लंघन करत एका बोआ सापाला स्पर्श केल्याने त्याला आध्यात्मिक विधी आणि काही पथ्य पाळावे लागले होते, तर तिथले पारंपरिक ‘चिचा’ पेय प्यायल्याने त्याची तब्येतही बिघडली होती. मात्र, आपल्या प्रामाणिकपणाने आणि प्रेमाने त्याने आदिवासी लोकांची मने जिंकली. आज जस्टिन आणि मारिया या जंगलात अतिशय आनंदाने राहत असून, त्यांच्या संसारात एका बाळाचेही आगमन झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेली त्यांची ही अनोखी प्रेमकथा आणि जंगलातील जीवनशैली सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.




