राज्यातील मोफत साडी योजना बंद करण्याच्या निर्णयावरून राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या निर्णयावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीच्या काळात महिलांसाठी अनेक घोषणा करणाऱ्या सरकारने आता दिलेल्या आश्वासनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
माध्यमांशी बोलताना रोहिणी खडसे यांनी सरकारला सवाल करत म्हटले की, “लाडक्या बहिणींना साडी देणेही आता सरकारला परवडत नाही का?” निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देण्यात आली, मात्र सत्तेत आल्यानंतर आर्थिक अडचणींचे कारण पुढे करून योजना बंद केल्या जात असल्याची टीका त्यांनी केली.
महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांमध्ये सातत्य असणे गरजेचे असल्याचेही खडसे यांनी सांगितले. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याऐवजी आर्थिक परिस्थितीचा आधार घेत योजना बंद करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मोफत साडी योजना बंद करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात असून, या मुद्द्यावर सरकारकडून काय भूमिका मांडली जाते याकडे महिला आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.




