Sushma Andhare : जयंत पाटील अर्थमंत्री होणार? सुषमा अंधारे यांनी आठवण करून दिली अजितदादांची ‘ती’ ताकद; तटकरेंवर डागली तोफ

spot_img

अजितदादांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता फक्त जयंतरावांमध्येच; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून अंधारेंचा खोचक टोला

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या सत्तेची समीकरणे आणि आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कारभार सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सांभाळत आहेत. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याकडे राज्याचे नवे अर्थमंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने चर्चांना उधाण आले आहे. या संभाव्य बदलांवर आता शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. जयंत पाटील यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतानाच त्यांनी अजित पवारांच्या कामाचीही आठवण करून दिली. पक्ष कोणताही असला तरी अजितदादांनी राज्याचे अर्थखाते अत्यंत उत्तम रीतीने हाताळले होते, असे सांगत दादांनंतर तेवढ्याच ताकदीने हे पद सांभाळण्याची क्षमता केवळ जयंत पाटील यांच्यातच असल्याचे अंधारे यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अजितदादांच्या निधनानंतर हे नेते आधी विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगत होते, आणि आता अचानक चर्चा झाल्याचा दावा करत आहेत; त्यामुळे नक्की कोणते तटकरे खरे?” असा सवाल त्यांनी केला. सुनील तटकरे केवळ स्वतःच्या मुलांना (अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे) मोठे करण्यात आणि त्यांना पदे मिळवून देण्यात व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, जयंत पाटील हे केवळ अधिकृत कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते, कोणत्याही भाजप नेत्याला नाही, असे सांगत त्यांनी पाटील यांच्या भूमिकेचे समर्थन केले.

सुनील तटकरेंच्या राजकारणावर थेट हल्ला चढवताना अंधारे म्हणाल्या की, तटकरेंना संपूर्ण पक्ष आपल्या ताब्यात घेता येईल असे वाटले होते, मात्र त्यात त्यांना अपयश आले. सुनेत्रा पवार यांना अगदी सहज बाजूला सारता येईल असा त्यांचा अंदाज होता, पण तो चुकला; म्हणूनच सरळ बोटाने तूप निघत नाही हे पाहून त्यांनी वाकड्या बोटाचा वापर सुरू केला आहे. दरम्यान, शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये (NDA) सामील होणार असल्याच्या वावड्या उठत असताना आणि काही आमदारांचा कलही त्या बाजूने असल्याचे बोलले जात असताना, सुषमा अंधारे यांच्या या विधानामुळे राजकीय समीकरणांना नवीन धार मिळाली आहे. जर आगामी काळात काही सकारात्मक घडामोडी घडल्या, तर राज्याच्या तिजोरीची चावी जयंत पाटील यांच्या हाती जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ