पुण्यात उघडकीस आलेल्या कथित रेव्ह पार्टी प्रकरणावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि गृहखात्यावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. या पार्टीत एकूण 156 तरुण-तरुणी उपस्थित असल्याची माहिती समोर आली असताना, त्यापैकी फक्त 78 जणांवरच एफआयआर दाखल करण्यात आल्याने कारवाईच्या निष्पक्षतेबाबत शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उर्वरित 78 जणांना रात्रीच कोणाच्या हस्तक्षेपामुळे मुक्त करण्यात आले, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय, पार्टीमध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्याचे संकेत मिळत असतानाही केवळ 29 जणांचीच ड्रग्ज चाचणी करण्यात आल्याबद्दलही वडेट्टीवार यांनी आक्षेप नोंदवला. आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली कुटुंबांतील मुलांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का आणि सामान्य कुटुंबांतील युवकांवरच कारवाई केली जात आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुण्यात वाढत्या ड्रग्ज नेटवर्कच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत, या प्रकरणाशी संबंधित फोन कॉल्स, राजकीय दबाव आणि निर्णय प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.




