साईबाबांच्या शिर्डीत प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या पेढ्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मंदिर परिसरातील काही खासगी दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचे आणि संशयास्पद पेढे विकले जात असल्याच्या तक्रारी भाविकांकडून केल्या जात आहेत. दररोज हजारो आणि वर्षभरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने प्रसादाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. मात्र अनेक पेढ्यांच्या पॅकेटवर उत्पादनाची तारीख, कालबाह्यता दिनांक, उत्पादकाचे नाव किंवा आवश्यक माहिती नमूद नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी पेढे कठीण, रंग बदललेले किंवा बुरशी लागलेल्या अवस्थेत विकले जात असल्याच्या तक्रारींमुळे भाविकांमध्ये नाराजी वाढली आहे.
प्रसादाच्या नावाखाली आरोग्याशी तडजोड केली जात असल्याचा आरोप होत असून, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि भाविकांकडून केली जात आहे. तसेच शिर्डी नगरपालिका आणि अन्न व औषध प्रशासनाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.




