Sunil Gavaskar : ‘बदलाच्या बाता थांबवा, फलंदाजी सुधारा!’; अफगाणिस्तानवरील विजयानंतरही सुनील गावस्करांचा गंभीर-गिल जोडीला कानमंत्र

spot_img

“संक्रमण काळ” (Transition Phase) हे केवळ एक निमित्त; कसोटीत टी-२० ची मानसिकता घातक ठरत असल्याचा ‘लिटल मास्टर’चा थेट इशारा

भारतीय क्रिकेट संघाने चंदीगड कसोटीत अफगाणिस्तानवर एक डाव आणि ३०० धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला असला, तरी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी संघाच्या कामगिरीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय संघ सध्या ‘संक्रमण काळात’ (ट्रान्झिशन फेज) असल्याचा दावा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुबमन गिल यांच्याकडून वारंवार केला जात आहे. मात्र, गावस्कर यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीनंतर संघात काही बदल होणे स्वाभाविक आहे, परंतु खराब कामगिरी लपवण्यासाठी ‘बदलाचा काळ’ हे कारण असू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी संघ व्यवस्थापनाला सुनावले.

जिओ हॉटस्टारशी बोलताना गावस्कर यांनी स्पष्ट केले की, भारतीय संघाची मुख्य चिंता गोलंदाजी नसून अत्यंत सुमार दर्जाची फलंदाजी ही आहे. अलीकडच्या काळात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या पराभवांचा दाखला देत त्यांनी फलंदाजांच्या तंत्रावर बोट ठेवले. अफगाणिस्तानविरुद्ध शुबमन गिल आणि केएल राहुल यांनी शतके ठोकली असली, तरी आव्हानात्मक परिस्थितीत भारतीय फलंदाजांना अधिक संयम आणि शिस्त दाखवावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कसोटी क्रिकेटमध्ये वाढत्या टी-२० मानसिकतेवर चिंता व्यक्त करताना गावस्कर म्हणाले की, काही चेंडू निर्धाव गेले की फलंदाज धीर गमावतात आणि चुकीचे फटके मारून बाद होतात. कसोटी क्रिकेटसाठी एक वेगळा दृष्टिकोन आणि मोठ्या खेळी खेळण्याची मानसिकता आवश्यक असते. त्यामुळे भविष्याचा किंवा बदलांचा अतिविचार करण्यापेक्षा खेळाडूंनी वर्तमानातील कामगिरीवर आणि कसोटीच्या दर्जावर लक्ष केंद्रित करावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ