Arjun Tendulkar : “आयपीएलमध्ये बेंचवर, मुंबई लीगमध्ये वादळ!” अर्जुन तेंडुलकरचा अष्टपैलू धमाका; टीकाकारांना दिलं चोख उत्तर

spot_img

३ विकेट्स आणि नाबाद ६६ धावांची खेळी; लखनौ सुपर जायंट्सने दुर्लक्षित केलेल्या अर्जुनचा सोशल मीडियावर डंका

आयपीएल २०२६ च्या संपूर्ण हंगामात लखनौ सुपर जायंट्सच्या बेंचवर बहुतांश वेळ घालवावा लागलेल्या अर्जुन तेंडुलकरने आता मैदान गाजवायला सुरुवात केली आहे. मुंबई टी२० लीगच्या १६ व्या सामन्यात ‘एआरसीएस अंधेरी’ (ARCS Andheri) संघाकडून खेळताना अर्जुनने आपल्या वादळी अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीकाकारांची तोंडे बंद केली. वांद्रे ब्लास्टर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने आधी अचूक गोलंदाजी आणि नंतर धुव्वादार फलंदाजी करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला आणि ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब पटकावला. त्याच्या या चमकदार कामगिरीनंतर “प्रामाणिक मेहनत करणाऱ्याला शेवटी यश मिळतेच” अशा शब्दांत क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

या सामन्यात वांद्रे ब्लास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १४४ धावा केल्या होत्या. अंधेरीकडून खेळणाऱ्या अर्जुनने गोलंदाजीत कमालीची अचूकता दाखवत ३ षटकांत अवघ्या ११ धावा देत ३ बळी घेतले, ज्यात एका निर्धाव (मेडन) षटकाचा समावेश होता. त्यानंतर १४५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या एआरसीएस अंधेरी संघासाठी अर्जुन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने अवघ्या ३४ चेंडूंमध्ये १९४.१२ च्या तुफानी स्ट्राईक रेटने नाबाद ६६ धावा कुटल्या. या स्फोटक खेळीत त्याने ४ चौकार आणि ५ गगनभेदी षटकार ठोकले. अर्जुनच्या या झंझावातामुळे अंधेरीने १३.५ षटकांतच अवघा १ गडी गमावून सामना खिशात घातला.

आयपीएल २०२६ मध्ये अर्जुनला केवळ एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती, जिथे त्याने ४ षटकांत ३६ धावा देऊन १ बळी घेतला होता. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. या पार्श्वभूमीवर आपल्या कामगिरीबद्दल बोलताना अर्जुन म्हणाला, “संघासाठी अशी कामगिरी करणे नेहमीच आनंददायी असते. मी फक्त योग्य टप्प्यावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि मला यश मिळाले. मी स्वतःला एक अष्टपैलू खेळाडू मानतो आणि संघ व्यवस्थापन मला ज्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवेल, तिथे योगदान देण्यास मी सदैव तयार आहे.”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ