कॉमनवेल्थ गेम्स २०२६ला २३ जुलैपासून स्कॉटलंडची राजधानी ग्लासगो येथे सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत ७० हून अधिक देशांतील ३ हजारांपेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले आहेत. यंदाच्या स्पर्धेत क्रीडा प्रकारांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली असून, एकूण १० खेळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक खेळाडूसाठी सुवर्णपदक जिंकणे हे आयुष्यातील मोठे स्वप्न असते. मात्र, ज्या पदकाला ‘गोल्ड मेडल’ म्हटले जाते, ते पूर्णपणे शुद्ध सोन्याचे असते का? याचे उत्तर नाही असे आहे.
कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई क्रीडा स्पर्धा किंवा ऑलिम्पिकमध्ये दिले जाणारे सुवर्णपदक प्रामुख्याने चांदीपासून तयार केले जाते. या पदकात स्टर्लिंग सिल्व्हरचा मोठा हिस्सा असतो आणि त्यावर सोन्याचा थर चढवला जातो. पदकात किमान ६ ग्रॅम सोन्याचा वापर केला जातो. त्यामुळे पदकाला आकर्षक सोन्याची चमक मिळते, मात्र ते पूर्णपणे सोन्याचे नसते.
शुद्ध सोन्याचे पदक तयार करणे अत्यंत खर्चिक ठरू शकते. त्याचबरोबर शुद्ध सोने तुलनेने मऊ असल्याने पदक वाकण्याची शक्यताही असते. त्यामुळे चांदीसारख्या मजबूत धातूवर सोन्याचा मुलामा देण्याची पद्धत वापरली जाते.
सिल्व्हर मेडल प्रामुख्याने स्टर्लिंग सिल्व्हरचे, तर ब्राँझ मेडल कांस्य धातूपासून तयार केले जाते. सुवर्णपदकाची किंमत प्रत्येक स्पर्धेनुसार बदलते. धातूंचे बाजारभाव, पदकाचा आकार आणि डिझाइन यावर त्याचा खर्च अवलंबून असतो. अंदाजे एका सुवर्णपदकासाठी १ ते २ लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. ग्लासगो २०२६मधील पदकांची रचना मिलित्सा मिलन्कोवा यांनी केली असून, त्यांची निर्मिती बर्मिंघममधील टॉय केनिंग अँड स्पेन्सर या संस्थेने केली आहे.




