मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीमुळे देशातील महत्त्वाच्या महापौर संघटनांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व अधिक बळकट झाले असून महानगराच्या विकासाशी संबंधित प्रश्न राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे मांडण्याची संधी निर्माण झाली आहे.
उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय महापौर परिषदेच्या 117 व्या कार्यकारी समितीच्या बैठकीदरम्यान त्या अधिकृतपणे उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. देशातील विविध शहरांमधील सुमारे 240 महापौरांचा सहभाग असलेल्या या संघटनेत त्यांची निवड ही मुंबईसाठी महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे.
रितू तावडे यांच्या नियुक्तीमुळे शहरी विकास, नागरी पायाभूत सुविधा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण आणि नागरिकांशी संबंधित विविध प्रश्नांवर मुंबईची भूमिका राष्ट्रीय व्यासपीठावर अधिक ठळकपणे मांडली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच महानगरपालिकांच्या कामकाजातील अनुभवांची देवाणघेवाण आणि विविध शहरांमधील समन्वय वाढविण्यासाठीही ही निवड महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, त्यांच्या या निवडीचे विविध राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रांतून स्वागत करण्यात येत असून अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मुंबईच्या नेतृत्वाला मिळालेला हा सन्मान शहराच्या प्रतिष्ठेत भर घालणारा असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.




