Anti Drugs Task Force in Tamil Nadu : तामिळनाडूत ड्रग्जविरोधात मोठी कारवाई; तीन दिवसांत हजारो गुन्हेगार ताब्यात

spot_img

तामिळनाडूमध्ये अमली पदार्थ आणि गुन्हेगारीविरोधात राज्य सरकारने मोठी मोहीम उघडली असून गेल्या तीन दिवसांत पोलिसांनी हजारो संशयितांवर कारवाई केली आहे. मुख्यमंत्री विजय यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या 48 तासांत घेतलेल्या कठोर निर्णयांनंतर राज्यभरात पोलिस यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले. विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी 3,246 गुन्हेगारांना ताब्यात घेतले, तर 419 अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली.

या कारवाईत राज्यभरातील 15 हजारांहून अधिक व्यक्तींची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये सराईत गुन्हेगारांसह अनेक संशयितांचा समावेश होता. चौकशीनंतर 844 जणांना विविध कायद्यांखाली न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. एनडीपीएस कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या धडक कारवाईत पोलिसांनी 267 किलोहून अधिक गांजा आणि हजारो मादक गोळ्या जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत सुमारे 1.43 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री विजय यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विशेष अमली पदार्थ विरोधी कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकांमार्फत ड्रग्ज तस्करी, विक्री आणि वापराविरोधात कठोर मोहीम राबवली जाणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र ‘सिंगाप्पेन’ कृती दल उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शाळा, धार्मिक स्थळे आणि बसस्थानकांच्या परिसरातील 717 दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातही ड्रग्जच्या वाढत्या समस्येवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असल्याचा आरोप करत सरकारला थेट सवाल केला. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत ड्रग्जचे जाळे पसरल्याचे सांगत त्यांनी अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे वास्तव मांडले. लहान वयातील मुलांच्या हातातही अमली पदार्थ पोहोचत असल्याने समाजासमोर गंभीर संकट उभे राहिल्याचे त्यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ