नटराजाच्या मूर्तीसमोर मॉडर्न फ्यूजन नृत्य केल्याने नेटिझन्स आक्रमक; प्रसिद्ध कोरिओग्राफर अनिता रत्नम यांच्याकडूनही तीव्र शब्दांत टीका
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता लक्ष्य लालवानी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘चांद मेरा दिल’ हा बहुप्रतिक्षित रोमँटिक ड्रामा चित्रपट २२ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. चित्रपटातील भावनिक कथानक, कलाकारांचा अभिनय आणि कॉलेज रोमान्सचा ट्रॅक यामुळे चित्रपट प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. मात्र, दुसरीकडे चित्रपटातील अनन्या पांडेच्या एका डान्स सीनमुळे सोशल मीडियावर एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.
हा चित्रपट एका तरुण प्रेमी युगुलाच्या कथेवर आधारित आहे, जे कॉलेजमध्ये असताना एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र, लग्नाआधीच आलेल्या प्रेग्नन्सीमुळे (गर्भधारणा) त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते आणि त्यांना अचानक मोठ्या जबाबदाऱ्यांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीमुळे नात्यात निर्माण होणारे गैरसमज, भावनिक ताण आणि बदलणारे आयुष्य याचे प्रभावी चित्रण यात करण्यात आले असून, कलाकारांच्या अभिनयाचे कौतुकही होत आहे.
चित्रपटात दाखवलेल्या कौतुकापेक्षा सध्या इंटरनेटवर अनन्या पांडेच्या ‘भरतनाट्यम’ डान्सची नकारात्मक चर्चा जास्त रंगत आहे. चित्रपटातील एका गाण्यात पारंपरिक भरतनाट्यम नृत्यशैलीला मॉडर्न म्युझिक आणि फ्यूजन कोरिओग्राफीची जोड देण्यात आली आहे. या दृश्यात पार्श्वभूमीत भगवान नटराजाची मूर्ती दिसत असताना अनन्या आधुनिक पाश्चात्त्य शैलीत नृत्य करताना दिसते, ज्यावर अनेकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी हा पारंपरिक भारतीय शास्त्रीय नृत्यकलेचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
एका युजरने अनन्याचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले, **”कोणीतरी हिला थांबवा!” दुसऱ्या एकाने लिहिले, “मी गरीब आहे, नाहीतर हे पाहून फोनच फोडला असता.”
तर एकाने, “हे नृत्य पाहून माझ्या कानांतून रक्त येण्याची वेळ आली आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
सामान्य प्रेक्षकांबरोबरच नृत्य क्षेत्रातील दिग्गज कोरिओग्राफर अनिता रत्नम यांनीही या सादरीकरणावर अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्या म्हणाल्या, “ही क्लिप पाहताना असे वाटले की जणू भरतनाट्यम या कलेला एका भयानक गैरसमजुतीने ओलीस (Hostage) ठेवले आहे. विस्कळीत हातवारे आणि कॅमेऱ्याच्या चुकीच्या हालचालींमुळे मूळ नृत्य स्वतःच तिथून शांतपणे निघून गेले आहे.”
भरतनाट्यमचे महत्त्व सांगताना त्या पुढे म्हणाल्या की, “ही कला तंत्र, नियंत्रण, परंपरा, भूमितीय अचूकता आणि भावनिक खोली यावर आधारित आहे. परंतु, या गाण्यात तिचे सादरीकरण एखाद्या लग्नातील नाचण्यासारखे (वेडिंग डान्स) हलके करण्यात आले आहे; जणू काही हलक्या भूकंपात हे शूटिंग झाले असावे. सर्वात वाईट म्हणजे, या संपूर्ण सादरीकरणाला आपण काहीतरी चुकीचे करत आहोत, याची पुसटशी जाणीवही नाही.” या वादामुळे ‘चांद मेरा दिल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालण्यापेक्षा वादाच्या भोवऱ्यात जास्त अडकला आहे.




