Iran-US War 2026 : “स्वतःची वाट लावून घ्यायची नसेल तर अटी माना”; इराणचा अमेरिकेला थेट इशारा, जागतिक अर्थव्यवस्थेत खळबळ!

spot_img

होर्मुज खाडीवर इराणचे नियंत्रण स्वीकारण्याचा सल्ला; अणुकरारातून (NPT) बाहेर पडण्याचीही दिली सर्वात मोठी धमकी

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम करार अगदी अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय वर्तुळात रंगत असतानाच, इराणने वॉशिंग्टनला अत्यंत कडक शब्दांत निर्वाणीचा इशारा दिला आहे. इराणने अमेरिकेला स्पष्ट सुनावले आहे की, जर स्वतःचा विनाश आणि अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजण्यापासून वाचायचे असेल, तर इराणने समोर ठेवलेल्या अटी मान्य करण्याशिवाय अमेरिकेकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. यात प्रामुख्याने धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘होर्मुज खाडी’ (Strait of Hormuz) वर इराणचे वर्चस्व स्वीकारणे हेच अमेरिकेच्या हिताचे राहील, असे इराणने म्हटले आहे.

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांचे सल्लागार मोहसेन रेजाई यांनी इराणच्या ‘तस्नीम न्यूज एजन्सी’शी बोलताना हा संदेश दिला. रेजाई म्हणाले की, “जर अमेरिकेने चर्चेचा मार्ग सोडून युद्धाचा रस्ता निवडला, तर त्यांना त्याचे अतोनात नुकसान सहन करावे लागेल. या युद्धामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल आणि तिचा विनाश निश्चित आहे.” त्यामुळे अमेरिकेने इराणसोबत सामोपचाराने चर्चा करून मार्ग काढण्यातच शहाणपण आहे, असेही त्यांनी नमूद केले.

होर्मुज खाडीवर इराणचे नियंत्रण असणे हे कायद्याला धरूनच असल्याचे स्पष्ट करत रेजाई यांनी जागतिक बाजाराला धीर देण्याचाही प्रयत्न केला. ते म्हणाले की, “या नियंत्रणाचा अर्थ असा नाही की आम्हाला जागतिक व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ रोखायची आहे. आमचा मुख्य उद्देश फारस (पर्शियन) खाडीतील असुरक्षितता संपवणे आणि बाहेरील देशांच्या लष्करी हस्तक्षेपाला पायबंद घालणे हाच आहे.”

मोहसेन रेजाई यांनी अमेरिकेला आतापर्यंतची सर्वात मोठी धमकी देताना म्हटले आहे की, जर अमेरिकेने इराणला डरावेण्याचा प्रयत्न केला किंवा कोणत्याही प्रकारच्या बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली, तर इराण कोणत्याही क्षणी जागतिक परमाणु अण्वस्त्र प्रसारबंदी करारातून (NPT) तात्काळ बाहेर पडेल.

इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि अटींमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कोणत्याही परिस्थितीत इराण मागे हटण्यास तयार नाही, उलट त्यांनी अमेरिकेलाच कोंडीत पकडले आहे. या युद्धाचा आणि वाढत्या तणावाचा मोठा फटका अमेरिकेला सहन करावा लागत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, अमेरिका सध्या सर्व बाजूंनी अडकली असून, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अखेर इराणच्या अटी मान्य करण्याचे संकेत अमेरिकेकडून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ