देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांवर आता नवा वाद निर्माण झाला आहे. परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि संभ्रमाचे वातावरण असताना, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने या प्रकरणावर महत्त्वाची भूमिका मांडली आहे. संसदीय समितीसमोर बोलताना NTA च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, देशभरात कोणतीही अधिकृत “पेपरफुटी” झालेली नाही. त्यांच्या मते, परीक्षेपूर्वी काही प्रश्न बाहेर आल्याच्या घटना समोर आल्या असल्या तरी त्याला थेट पेपर लीक म्हणता येणार नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, NTA ने सांगितले की या प्रकरणाचा तपास सध्या CBI करत असून, तपास यंत्रणेकडून पेपरफुटीची ठोस पुष्टी झाल्यानंतरच एजन्सी याबाबत अधिकृत स्वीकार करेल. त्यामुळे सध्या तरी “पेपर फुटला” असे मान्य करणे शक्य नसल्याचे त्यांनी समितीसमोर स्पष्ट केले. दरम्यान, परीक्षेतील गोंधळामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांवर मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक ताण वाढला असून, या प्रकरणावरून देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.




