Office Bag : फॅशन की फिटनेस? ऑफिस बॅग निवडताना आरोग्याशी तडजोड नको; जाणून घ्या योग्य पर्याय!

spot_img

रोजच्या जड वजनामुळे खांदे आणि पाठदुखीचा त्रास टाळण्यासाठी ‘या’ ४ प्रकारच्या बॅग्स समजून घेणे आहे अत्यंत गरजेचे.

कामाच्या व्यापापामुळे ऑफिसला जाताना बॅगमध्ये लॅपटॉप, चार्जर, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली आणि इतर गरजेच्या साहित्यांचा भरणा असतो. साहजिकच यामुळे बॅगचे वजन खूप वाढते. पण, केवळ ‘स्टाईल’ म्हणून कोणत्याही प्रकारची बॅग वापरणे तुमच्या शरीरासाठी महागात पडू शकते. चुकीच्या बॅगची निवड थेट तुमच्या खांद्यावर, मानेवर आणि पाठीवर ताण आणून गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकते. म्हणूनच, कामावर जाताना वापरली जाणारी बॅग ही वजनाने हलकी आणि हाताळण्यास सोपी असावी.

१. टोट बॅग्स (Tote Bags)

सध्या नोकरदार महिला आणि तरुणींमध्ये ‘टोट बॅग्स’ वापरण्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. या बॅग्स दिसायला अत्यंत आकर्षक आणि फॅशनेबल असतात. परंतु, जर तुमच्याकडे लॅपटॉपसह जास्त सामान असेल, तर टोट बॅग वापरणे टाळावे. याचे कारण म्हणजे या बॅगचे संपूर्ण वजन शरीराच्या एकाच खांद्यावर येते. रोज अशा प्रकारे वजनदार बॅग एकाच खांद्याला अडकवल्याने शरीर एका बाजूला झुकू शकते, ज्यामुळे मानदुखी किंवा खांदेदुखीचा तीव्र त्रास सुरू होतो.

२. टॉप हँडल बॅग्स (Top Handle Bags)

हल्ली हाताच्या कोपरात किंवा मनगटात अडकवून कॅरी केल्या जाणाऱ्या ‘टॉप हँडल बॅग्स’ ऑफिस फॅशनमध्ये खूप लोकप्रिय आहेत. दिसायला त्या अत्यंत कॉर्पोरेट लुक देतात. मात्र, जर तुमचे सामान जास्त असेल, तर या बॅग्स एकाच हाताने सातत्याने उचलल्यामुळे हाताचे स्नायू दुखू लागतात. जास्त वजनाचा लॅपटॉप आणि डबा या बॅगमध्ये ठेवून ती हाताने कॅरी न करण्याचा सल्ला अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ (Orthopedic Doctors) देतात.

३. क्रॉस बॅग्स (Crossbody Bags)

शरीरावर तिरप्या पद्धतीने अडकवल्या जाणाऱ्या क्रॉस बॅग्स या ऑफिससाठी एक चांगला आणि आरामदायी पर्याय मानल्या जातात. या बॅग्समुळे शरीराचे दुखणे इतर सिंगल-स्ट्रॅप बॅग्सच्या तुलनेत बरेच कमी होते. ही बॅग वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की, बॅगचा सामान असणारा मुख्य भाग तुमच्या कंबरेच्या उंचीएवढा वर असावा. यामुळे वजनाचे संतुलन योग्य प्रमाणात राखले जाऊन पाठीवर थेट ताण येत नाही.

४. बॅकपॅक (Backpacks)

जर तुमच्या ऑफिसच्या बॅगचे वजन तुमच्या शरीराच्या वजनाच्या ५ टक्क्यांपेक्षा अधिक (किंवा खूप जास्त) असेल, तर डोळे झाकून ‘बॅकपॅक’ म्हणजेच पाठीवर अडकवण्याच्या सॅकला प्रथम प्राधान्य द्यावे. जास्त वजनाचे साहित्य वाहून नेण्यासाठी हा सर्वात उत्तम आणि सुरक्षित मार्ग आहे. यामुळे वजन दोन्ही खांद्यांवर समान विभागले जाते. यातही ‘वेस्टबँड’ (कंबरेला बांधता येणारा बेल्ट) असलेला बॅकपॅक निवडल्यास पाठीच्या कण्यावरील ताण पूर्णपणे कमी होऊन शरीराचे योग्य संतुलन राखले जाते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ