‘करो या मरो’च्या लढतीत SRH चा थरारक विजय; संजू सॅमसनच्या धोनी स्टाईल स्टम्पिंगनंतर मैदानावर मोठा राडा
आयपीएल 2026 चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्लेऑफच्या शर्यतीचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. काल चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात झालेला सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा होता. या हाय-स्कोअरिंग आणि अटीतटीच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने 5 गडी राखून बाजी मारली आणि प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले. हैदराबादने चेन्नईने दिलेले 181 धावांचे आव्हान 19 व्या ओव्हरमध्येच गाठले. या पराभवामुळे गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग आता कमालीचा खडतर झाला आहे.
नेहमी मैदानावर शांत आणि संयमी राहणारा भारताचा यष्टीरक्षक संजू सॅमसन काल मात्र चांगलाच आक्रमक मूडमध्ये दिसला. सामन्याच्या 15 व्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा तुफानी फलंदाज हेनरिक क्लासेन आणि संजू सॅमसन यांच्यात जोरदार राडा पाहायला मिळाला.
हैदराबादच्या डावातील 15 वे षटक नूर अहमद टाकत होता. या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर क्लासेनने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण नूरच्या गुगलीने त्याला चकवले. क्लासेनचा पाय हवेत उचलला गेला आणि विकेटच्या मागे सज्ज असलेल्या संजू सॅमसनने चपळाई दाखवत बेल्स उडवल्या. क्लासेनला आपण नाबाद असल्याचा विश्वास होता, पण थर्ड अंपायरने सखोल तपासणीनंतर त्याला बाद घोषित केले.
क्लासेन बाद झाल्यानंतर संजू सॅमसन त्याच्याकडे रोखून पाहत होता, जे दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाला अजिबात आवडले नाही. यावरून दोघांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक सुरू झाली. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले, ज्यामुळे मैदानावरील वातावरण कमालीचे तापले होते. शेवटी इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत दोघांना एकमेकांपासून दूर केले. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना संतापलेल्या क्लासेनने मागे वळून संजूच्या दिशेने थुंकत आपला राग व्यक्त केला, ज्यामुळे क्रीडा जगतात नवीन वादाला तोंड फुटले आहे.
या कठीण आणि फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर हेनरिक क्लासेनने आपली ताकद दाखवून दिली. त्याने अवघ्या 26 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 180.77 च्या तुफानी स्ट्राईक रेटने 47 धावा कुटल्या. त्याने इशान किशनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 41 चेंडूत 75 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली, ज्याने सामन्याचे पारडे पूर्णपणे हैदराबादच्या बाजूने झुकवले.
हेनरिक क्लासेनने चालू हंगामात अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने 13 सामन्यांमध्ये 50.45 च्या सरासरीने आणि 155 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने तब्बल 555 धावा ठोकल्या असून तो या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक ठरला आहे.




