लातूर-नांदेडच्या ‘किंग ऑफ केमिस्ट्री’च्या अटकेने खळबळ; कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक, क्लासेसच्या बोर्डला काळे फासणार
नीट (NEET) परीक्षा गैरव्यवहार आणि पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे अखेर महाराष्ट्रातील लातूर आणि नांदेडपर्यंत पोहोचले असून, याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) नामांकित ‘आरसीसी’ (RCC) क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक केली आहे. मोटेगावकर यांच्या अटकेमुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या अटकेनंतर सोशल मीडियावर त्यांचे काही जुने व्हिडिओ आणि रील्स प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते ‘पुष्पा’ चित्रपटातील प्रसिद्ध संवादाची नक्कल करताना दिसत आहेत. “आरसीसी समझके फ्लॉवर समझे क्या… झुकेगा नही साला!” असे म्हणणाऱ्या मोटेगावकरांना आता सीबीआयने झुकवले, अशा शब्दांत नेटिझन्स त्यांना जोरदार ट्रोल करत आहेत. ‘किंग ऑफ केमिस्ट्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोटेगावकरांच्या या रीलवरून सध्या सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे.
दुसरीकडे, या अटकेचे तीव्र राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. सीबीआयने अत्यंत गुप्ततेने तपास करत पुरेसे पुरावे गोळा करून मोटेगावकरांना बेड्या ठोकल्या असून, या मोठ्या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचे हात गुंतले आहेत याचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, या घोटाळ्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना कमालीची आक्रमक झाली आहे. आज कोल्हापुरातील ‘आरसीसी’ क्लासेसच्या कार्यालयाबाहेर ठाकरे गटाकडून तीव्र निदर्शने केली जाणार असून, क्लासच्या बोर्डला काळे फासण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. यामुळे या परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.




