२००२ पासूनचा शिरस्ता यंदा मोडला? आलियाच्या एन्ट्रीने आणि ऐश्वर्याच्या अनुपस्थितीने ‘कान्स २०२६’ मध्ये नवा वाद
बॉलिवूडची ‘ब्युटी क्वीन’ ऐश्वर्या राय बच्चन आणि ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ हे जणू एकमेकांचे समीकरण बनले आहे. मात्र, यंदा १२ मे रोजी फ्रान्समध्ये सुरू झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात पहिल्यांदाच ऐश्वर्याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत असून, त्यामुळे सोशल मीडियावर वादाचे मोहोळ उठले आहे. लॉरियाल पॅरिसने त्यांच्या अधिकृत पेजवर यंदाच्या ब्रँड एम्बेसेडर्सचे पोस्टर झळकवले, ज्यात आलिया भट्ट, व्हियोला डेव्हिस आणि हेलन मिरेन सारख्या जागतिक अभिनेत्रींची झलक दिसली, मात्र दोन दशकांहून अधिक काळ ब्रँडचा चेहरा राहिलेली ऐश्वर्या गायब होती. हॉटेल मार्टिनेझवर लावलेल्या मोठ्या बॅनर्समध्येही ऐश्वर्याचे पोस्टर न दिसल्याने संतापलेल्या चाहत्यांनी ब्रँडला “ओरिजनल क्वीन कुठे आहे?” असा जाब विचारला. चाहत्यांच्या या प्रचंड दबावानंतर ब्रँडने “ऐश्वर्याने कधीही कान्सची हजेरी चुकवलेली नाही” असे संदिग्ध उत्तर दिले असले तरी, तिच्या अनुपस्थितीने चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे.
संजय लीला भन्साळींच्या ‘देवदास’ (२००२) पासून सुरू झालेला ऐश्वर्याचा हा कान्स प्रवास जागतिक फॅशन विश्वात एक बेंचमार्क मानला जातो. यंदा आलिया भट्टची कान्समध्ये झालेली दिमाखदार एन्ट्री आणि ऐश्वर्याला प्रमोशनमधून वगळणे, यामुळे ब्रँड जुन्या चेहऱ्यांऐवजी नवीन चेहऱ्यांकडे झुकत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, कान्स फेस्टिव्हल २३ मे पर्यंत चालणार असून ताज्या अपडेट्सनुसार, ऐश्वर्या २२ मे रोजी रेड कार्पेटवर चालण्याची शक्यता आहे. ऐश्वर्या केवळ एक अभिनेत्री नसून कान्सचा एक अविभाज्य भाग आहे; त्यामुळे तिची केवळ एक झलक पाहण्यासाठी जगभरातील चाहते सध्या आतुर आहेत. “तिचा औरा कोणालाच रिप्लेस करता येणार नाही,” अशा शब्दांत नेटकऱ्यांनी ऐश्वर्याचे समर्थन करत ब्रँडला धारेवर धरले आहे. आता २२ मे ला ऐश्वर्या आपले सौंदर्याचे साम्राज्य पुन्हा गाजवते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




