दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा होणारा ‘अर्थ डे’ म्हणजेच जागतिक वसुंधरा दिन, पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पृथ्वीचं जतन आणि संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, याची जाणीव करून देणं हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. या निमित्ताने जगभरात विविध उपक्रम राबवले जातात.
या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती केली जाते. झाडे लावणे, स्वच्छता मोहिमा राबवणे, कचरा व्यवस्थापनावर भर देणे तसेच शाश्वत जीवनशैली स्वीकारण्याबाबत नागरिकांना प्रोत्साहित केले जाते. अनेक ठिकाणी पर्यावरण वाचवण्याची शपथही घेतली जाते.
वसुंधरा दिनाची सुरुवात 1970 साली अमेरिकेत झाली. पर्यावरणवादी आणि सिनेटर गेलार्ड नेल्सन यांनी या संकल्पनेला मूर्त रूप दिलं, तर हार्वर्ड विद्यापीठातील विद्यार्थी Denis Hayes यांनी या उपक्रमाला मोठं स्वरूप दिलं. 1969 मध्ये सिएटल येथे झालेल्या परिषदेत या दिवसाची घोषणा करण्यात आली होती. त्या काळात वाढत चाललेली जंगलतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता हा उपक्रम सुरू करण्यात आला.
आज हा दिवस जगातील 190 पेक्षा अधिक देशांमध्ये साजरा केला जातो आणि लाखो लोक त्यात सहभागी होतात. दरवर्षी या दिनासाठी एक विशेष थीम ठरवली जाते. 2026 साठी ‘Our Power, Our Planet’ ही थीम निश्चित करण्यात आली असून, पृथ्वीच्या रक्षणासाठी प्रत्येकाने आपली भूमिका ओळखून कृती करण्याचा संदेश यातून दिला जात आहे.
वसुंधरा दिन हा केवळ एक दिवस नसून, पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याची सततची प्रेरणा आहे.




