भारतामध्ये अनेक पर्यटनस्थळे त्यांच्या निसर्गसौंदर्याबरोबरच रंजक दंतकथांसाठीही प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे उमियाम तलाव, ज्याला ‘अश्रूंचं सरोवर’ म्हणूनही ओळखलं जातं. या तलावामागे एक हळवी आणि भावनिक कथा सांगितली जाते, जी पर्यटकांना आकर्षित करते.
स्थानिक कथेनुसार, प्राचीन काळी स्वर्गातून दोन बहिणी पृथ्वीवर आल्या होत्या. मात्र प्रवासादरम्यान त्यापैकी एक बहिण हरवली. दुसरी बहिण तिचा खूप शोध घेत राहिली, पण ती सापडली नाही. आपल्या बहिणीच्या विरहाने व्याकूळ झालेली ती इतकी रडली की तिच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनीच या तलावाची निर्मिती झाली, अशी समजूत आहे. त्यामुळे या तलावाला ‘अश्रूंचं सरोवर’ असं काव्यात्म नाव मिळालं आहे.
हा तलाव मेघालय आणि शिलाँग मधील शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे. स्थानिक लोक याला ‘बारापाणी’ या नावानेही ओळखतात, ज्याचा अर्थ ‘मोठं पाणी’ असा होतो. शांत, थंड आणि हिरवाईने नटलेलं वातावरण या ठिकाणाला अधिक मोहक बनवतं.
पर्यटकांसाठी येथे बोटिंगसारख्या उपक्रमांचाही आनंद घेता येतो. विशेषतः ऑक्टोबर ते एप्रिल हा कालावधी येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात पावसाचं प्रमाण कमी असतं आणि हवामान आल्हाददायक असतं, ज्यामुळे निसर्गाचा आनंद मनसोक्त घेता येतो.
उमियाम तलाव हा केवळ एक पर्यटनस्थळ नसून, तो निसर्ग आणि भावनांचा सुंदर संगम मानला जातो.




