“मी स्वतः खरातला फोन केले होते, माझ्याकडे रेकॉर्ड आहे”; बदनामीच्या आरोपावरून केसरकरांनी मांडली स्पष्ट भूमिका
राज्यात सध्या ‘अशोक खरात’ प्रकरण वादळासारखे घोंगावत असून, राजकीय नेत्यांचे त्यांच्यासोबतचे फोटो आणि संपर्क आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या मुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधत “केसरकरांची एसआयटी चौकशी कधी होणार?” असा थेट सवाल मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना केला होता. अंधारेंच्या या आक्रमक भूमिकेनंतर दीपक केसरकर यांनी आपली बाजू स्पष्ट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
केसरकर म्हणाले की, “एसआयटी आणि ईडी या दोन्ही यंत्रणा सध्या तपास करत आहेत. केवळ कोणासोबत फोटो असणे किंवा ओळख असणे हा गुन्हा ठरू शकत नाही. विनाकारण प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण देऊन बदनामी करणे चुकीचे आहे.” खरातला फोन केल्याच्या आरोपावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी स्वतः खरातला फोन केले होते आणि त्याचे रेकॉर्ड त्यांच्याकडे सुरक्षित आहे. तसेच, दिलीप लोंढे हे माझे कधीही ‘पीए’ नव्हते, त्यामुळे त्यांच्या फोन कॉल्सशी माझा संबंध जोडणे हास्यास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या कथित ‘काळ्या जादू’च्या प्रकारावरही केसरकरांनी भाष्य केले. “या प्रकरणाची आपल्याला माहिती नाही, परंतु दादांचा अपघात दुर्दैवी होता. यामागे जो कोणी जबाबदार असेल, त्याला सोडले जाणार नाही, असा शब्द खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.




