मुंबईत २४ कॅरेटचा दर १.५५ लाखांवर; चांदीही २.७० लाखांच्या घरात, जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा फटका
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला आता अवघे काही दिवस उरले आहेत. या शुभ दिवशी सोन्याची खरेदी करणे ही परंपरा असली, तरी यंदा सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमती पाहून सामान्य ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत. आज, गुरुवार १६ एप्रिल २०२६ रोजी जाहीर झालेल्या दरांनुसार, मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५५,३६० रुपये इतका झाला आहे. राजधानी दिल्लीत तर हा दर १.५५ लाखांच्याही पुढे गेला असून, सणासुदीच्या काळात सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज सकाळी चांदीचा दर प्रति किलो २ लाख ७० हजार १०० रुपये इतका नोंदवला गेला. सोन्याच्या तुलनेत चांदीनेही आपली ‘चमक’ दाखवत एकाच दिवसात हजारो रुपयांची वाढ नोंदवली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत असली, तरी डॉलरची कमजोरी आणि इस्रायल-इराण युद्धाचे पडसाद अद्याप मौल्यवान धातूंच्या किमतींवर उमटत आहेत. जागतिक बाजारात सोन्याचा भाव ४,७९५ डॉलर प्रति औंस इतका प्रचंड वाढल्याने देशांतर्गत बाजारात दर कमी होण्याची चिन्हे सध्या दिसत नाहीत.
येत्या रविवारी, १९ एप्रिलला अक्षय्य तृतीया असल्याने सराफा बाजारात साठेदार आणि दागिने विक्रेत्यांची खरेदी वाढली आहे, ज्यामुळे भावात सातत्याने तेजी जाणवत आहे. पुणे, बंगळुरू आणि मुंबईत दर जवळपास सारखेच असले, तरी चेन्नईत सोन्याने १.५६ लाखांचा टप्पा गाठला आहे. जानेवारी महिन्यात चांदी ४ लाखांच्या पार गेल्याने सध्या ती काहीशी ‘स्वस्त’ वाटत असली, तरी सामान्य मध्यमवर्गीयांसाठी सोन्याची ही विक्रमी भाववाढ अक्षय्य तृतीयेचा उत्साह काहीसा कमी करणारी ठरू शकते.
तुमच्या शहरातील आजचे दर (२४ कॅरेट – प्रति १० ग्रॅम):
- दिल्ली: ₹१,५५,५१०
- मुंबई/पुणे: ₹१,५५,३६०
- चेन्नई: ₹१,५६,२३०
- चांदी (प्रति किलो): ₹२,७०,१००




