शेअर बाजारातील चढ-उतारांच्या काळात मेहनतीची कमाई वाचवण्याचे आणि वाढवण्याचे तज्ज्ञांचे खास ‘फायनान्शियल फॉर्म्युले’
आजच्या काळात केवळ पैसे कमावणे पुरेसे नसून, त्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आणि समजदारीने खर्च करणे तितकेच महत्त्वाचे बनले आहे. सध्या जागतिक तणावामुळे शेअर बाजारातून गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर पैसे काढून घेत आहेत, ज्यामुळे बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा कठीण परिस्थितीतही तुमची मेहनतीची कमाई सुरक्षित राहावी आणि तिची सातत्याने वाढ व्हावी, यासाठी तज्ज्ञांनी आर्थिक नियोजनाचे ७ सोपे आणि अत्यंत प्रभावी नियम सांगितले आहेत. हे नियम पाळल्यास कोणतीही व्यक्ती आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकते.
गुंतवणूक विश्वात पैसे किती दिवसांत वाढतील, हे समजून घेण्यासाठी तीन प्रमुख नियम अत्यंत लोकप्रिय आहेत. पहिला आहे ‘रूल ऑफ ७२’ (Rule of 72), जो तुमची रक्कम किती वर्षांत दुप्पट होईल हे सांगतो. जर तुम्हाला गुंतवणुकीवर १२ टक्के वार्षिक परतावा (Return) मिळत असेल, तर ७२ ला १२ ने भागल्यास उत्तर ६ येते; म्हणजेच ६ वर्षांत तुमचे पैसे दुप्पट होतील. दुसरा ‘रूल ऑफ ११४’ (Rule of 114) हा पैसे तिप्पट कधी होणार हे शोधण्यासाठी वापरला जातो. १२ टक्के परताव्याच्या हिशोबाने ११४ ला १२ ने भागल्यास साधारण ९.५ वर्षांत तुमचे पैसे तिप्पट होऊ शकतात. तर तिसरा ‘रूल ऑफ १४४’ (Rule of 144) गुंतवणूक चार पट होण्याचा कालावधी दर्शवतो. १२ टक्के रिटर्ननुसार सुमारे १२ वर्षांत तुमची रक्कम चौपट होऊ शकते.
यासोबतच, महिन्याच्या पगाराचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ‘५०-३०-२० चा नियम’ खूप फायदेशीर ठरतो. समजा तुमचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपये असेल, तर त्यातील ५० टक्के (२५ हजार) रक्कम घरभाडे आणि रेशनसारख्या अत्यावश्यक खर्चासाठी वापरावी. उरलेल्या रकमेतील ३० टक्के हिस्सा मनोरंजन, हॉटेलिंग आणि फिरण्यासाठी खर्च करावा, तर उर्वरित २० टक्के रक्कम दरमहा ‘एसआयपी’ (SIP) किंवा कॅश रिझर्व्हच्या माध्यमातून भविष्यासाठी गुंतवावी. तसेच, गुंतवणुकीचा किती हिस्सा सुरक्षित ठेवायचा आणि किती शेअर्समध्ये टाकायचा, यासाठी ‘१०० वजा तुमचे वय’ (100 – Age Rule) हा नियम काम करतो. उदा. तुमचे वय ३० वर्षे असल्यास, १०० मधून ३० वजा करून उरलेले ७० टक्के पैसे तुम्ही इक्विटीमध्ये (शेअर बाजार) आणि ३० टक्के पैसे डेट फंडात सुरक्षित ठेवू शकता.
आर्थिक शिस्तीचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे किमान बचत आणि इमर्जन्सी फंड. प्रत्येक व्यक्तीने आपल्या एकूण कमाईतील किमान १० टक्के भाग नेहमी बाजूला काढून गुंतवला पाहिजे आणि उत्पन्न वाढेल तशी ही गुंतवणूक वाढवत नेली पाहिजे. याशिवाय, अनपेक्षित संकट जसे की नोकरी जाणे किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या काळासाठी ‘इमर्जन्सी फंड’ (आत्पकालीन निधी) तयार असणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या किमान ६ महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम नेहमी बँकेत किंवाLiquid फंडात सुरक्षित असायला हवी. या ७ सुत्रांचा योग्य वापर केल्यास बचतीचे उत्तम संतुलन साधून कोणतीही व्यक्ती दीर्घकाळात आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकते.




