NASA Artemis Rocket Launch : ५० वर्षांनंतर माणूस पुन्हा चंद्राच्या वाटेवर! नासाचे ‘आर्टेमिस २’ मिशन झेपावले; ४ अंतराळवीर रचणार इतिहास

spot_img

अडथळ्यांची शर्यत पार करत ‘ओरियन’चे उड्डाण; मंगळ मोहिमेच्या दिशेने मानवाचे मोठे पाऊल

अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने (NASA) गुरुवारी पहाटे एका नव्या युगाची सुरुवात केली आहे. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ‘आर्टेमिस II’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. अमेरिकन वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी ६:३५ वाजता (भारतीय वेळेनुसार गुरुवारी पहाटे ३:५४ वाजता) हे यान अवकाशात झेपावले. विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चाचणीत गळतीची समस्या समोर आली होती आणि त्यानंतर कोणतीही मोठी ‘वेट टेस्टिंग’ न करता नासाने हे धाडस केले आहे. चंद्राला प्रदक्षिणा घालून हे यान मानवी वसाहतीच्या स्वप्नाला बळ देणार आहे.

या ऐतिहासिक मोहिमेत चार धाडसी अंतराळवीरांचा समावेश आहे, जे ‘इंटिग्रिटी’ (Integrity) नावाच्या ओरियन अंतराळ यानातून प्रवास करत आहेत:

  • रीड वाईजमॅन: मोहीम प्रमुख (Commander)
  • व्हिक्टर ग्लोव्हर: मोहीम चालक (Pilot)
  • क्रिस्टीना कोच: मोहीम तज्ज्ञ (Mission Specialist)
  • जेरेमी हॅन्सन: कॅनडाचे अंतराळवीर आणि मोहीम तज्ज्ञ

हे चारही अंतराळवीर चंद्राभोवती फेरी मारून १० दिवसांनंतर पुन्हा पृथ्वीवर परतणार आहेत. हे मिशन केवळ चंद्रच नाही, तर भविष्यातील मंगळ मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

आर्टेमिस II मोहिमेदरम्यान हे अंतराळवीर पृथ्वीपासून इतक्या लांबवर प्रवास करतील की, यापूर्वीचा ‘अपोलो १३’ मोहिमेचा विक्रम मोडीत निघणार आहे. या प्रवासात अंतराळवीर रेडिएशनपासून सुरक्षा, आपत्कालीन यंत्रणा आणि लेझर आधारित हाय-टेक संवाद प्रणालीची कसून तपासणी करणार आहेत.

नासाच्या या मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ चंद्राला स्पर्श करणे हा नसून, तिथे मानवी वसाहत स्थापन करण्याच्या शक्यता पडताळून पाहणे हा आहे. या यशानंतर पुढील टप्प्यात मानवाला प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले जाईल. चंद्रावर राहण्याचा अनुभव मिळाल्यानंतर मानवाचा पुढचा मुक्काम ‘मंगळ’ ग्रहावर असेल, अशी तयारी या मोहिमेद्वारे केली जात आहे. जगाचे लक्ष आता या चार अंतराळवीरांच्या सुरक्षित परतीकडे लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ