राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा भूकंप येण्याची शक्यता खासदार संजय राऊत यांनी वर्तवली आहे. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी महायुतीमध्ये मोठ्या हालचाली सुरू असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. त्यांच्या दाव्यानुसार, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष लवकरच भाजपमध्ये विलीन होऊ शकतात. राऊतांनी केवळ दावाच केला नाही, तर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांचा थेट आकडाच जाहीर केला आहे.
राऊत म्हणाले की, राष्ट्रवादीचे २५ ते ३० आमदार आणि शिंदे गटाचे तितकेच म्हणजे २५ आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. हे सर्व आमदार सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असून, योग्य वेळी हे विलीनीकरण होईल असे संकेत त्यांनी दिले. या विलीनीकरणाचे नेतृत्व कोणाकडे असेल हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा असल्या तरी भविष्यात या पक्षांना स्वतःचे अस्तित्व टिकवणे कठीण जाईल आणि त्यांना भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असे राऊत यांनी ठामपणे मांडले.
यावेळी संजय राऊतांनी केवळ आमदारांवरच नव्हे, तर न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगावरही तोफ डागली. सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “न्यायालयीन प्रक्रिया लांबणीवर टाकून लोकशाहीची चेष्टा केली जात आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. वारंवार असे दावे करून राऊतांनी सत्ताधारी गोटात अस्वस्थता निर्माण केली असून, आता भाजप किंवा महायुतीतील इतर नेते यावर काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




